
मा. दीनानाथ यांचे निधन झाले होते. घरात सगळेच दुःखात होते. त्यातच हृदयनाथ मंगेशकर यांच्या पायातले दुषित रक्त जळवांच्या मार्फत काढायचे ठरले. त्यांच्या बहिणांना हे वेदनादायी होते. आधीच बाबांचा विरह आणि त्यात हे उपचार. हळव्या आणि भावावर अतोनात प्रेम करणाऱ्या लतादीदी अस्वस्थ न झाल्या तर नवल. साराच प्रकार वेगळा आणि परीक्षा पाहणारा. त्या काळाच्या आठवणी जागवत आहेत स्वतः पंडित हृदयनाथजी...
बा बांच्या आसनासमोर, हात जोडून डोळे बंद करून दीदी पुटपुटत होती. पुटपटत नव्हती, ती ते श्री शारदा विश्व मोहिनी भविष्यातले अलौकिक गाणे गात होती. ते स्वर स्वसंवेद्या होते, ते गान आत्मरूपी होते, ते स्वर खळांची व्यंकटी सांडत होते, ते सत् कर्माला रती प्राप्त करून देत होते. जे सर्व प्राणिमात्रांना सुखी करत होते. आनंद देत होते. त्या गानाची साथ सरस्वतीची वीणा करीत होती आणि महादेवाचा डमरू ताल धरत होता. व्यास, वाल्मिकी काव्यरचना करत होते आणि ब्रह्मा स्वरावली निर्मित होते.
ती स्वरावली गंधर्व, गुणगुणत दीदीपर्यंत पोहोचवत होते. त्यात द्रौपदीची असाह्यता, सीतेची करुणा, कर्णाचे अश्रू आणि कुंतीची अगतिकता मिसळून कलादीने आर्त, करुणरस तयार केला, कशीश आणि दर्दच्या आकृतिबंधावर त्या रसाला शिंपडून ‘जीव सांडून पडेल’ असा आर्त स्वर तिने प्रकट केला. त्या स्वरात आनंद होताच, प्रणयरंग तरंगत होता, तारुण्यातले उमाळे उसासे होते, निसर्गाचे गान होते. तर भक्तीचे आनंद तरंग तरंगत होते, ह्रदयभंगाचे, मनोभंगाचे, यशोभंगाचे अनामिक हुंदके, दीर्घ निःश्वास, सुस्कार हताश, अगतिक, निराश स्वर वेदनेने कण्हत होते. नवरसांचं एक नवरंगी मिश्रण संगीतमय होऊन विश्व श्वास झाले होते. विश्व नाद, झाले होते.