
एक बोळ, मेलेल्या अजगरासारखा. मरतानाही काही मोठं जनावर खाल्ल्यासारखा पोट तणावलेला. गलिच्छ वास सुटलेला, कचरा साठलेला. तिथे आमचे घर. एक मजली. पण ऐसपैस, स्वयंपाक घर, हॅाल, झोपायची खोली, संगीताची खोली, वरती लांबलचक गच्ची. त्याच्या बाजूला एक रस्ता, वाहता, गजबजलेला. बाजूला बाहुलीचा हौद आणि दगडुशेठ गणपती. गावडे यांचे दुकान, आमचे वाणी आणि चॅाकलेट, गोळ्या पुरवणारे. पण आज सारे शांत, कारण पुण्यात मार्शल लॉ (संचार बंदी) पुकारण्यात आला आहे, अशी अफवा.
दुसऱ्या महायुद्धाचे दिवस, रोज नव्या अफवा. आज जर्मन सैन्य दिसले, शनिवार वाड्यावर बॉम्ब हल्ला. सदाशिव पेठ, जर्मनीच्या ताब्यात... वगैरे वगैरे. सारे पुणेकर धास्तावलेले. त्यात एप्रिल, पुण्यातल्या खास गर्मीचा महिना, दीदी स्थितप्रज्ञासारखी बसलीय. बाबा ज्या ठिकाणी गायला बसायचे, ते त्यांचे आसन, म्हणजे सतरंजी आणि भिंतीला टेकविलेली उशी, त्यांचे तानपुरे, आज ‘आवाज गमावून बसलेले’. सारे सारे निःशब्द, शांत, शांत आवाज फक्त, हुंदके दाबण्याचा प्रयत्न करण्याऱ्या आईच्या निष्फळ प्रयत्नांचा. माझ्या रडण्याचा, किंचाळण्यांचा.