
‘प्र भात’ने ‘गोकुळ’ची निर्मिती केली. ‘प्रभात’ची धुरा बाबूराव पै सांभाळत होते. बाबूराव पै यांचे प्रिय दैवत श्रीकृष्ण आणि त्याचे निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान याचे चाहते असल्याने ही कृष्णकथा त्याप्रमाणे मांडली होती. अन्यायाविरुद्ध लढा आणि एकजुटीचा संदेश त्या वेळच्या स्वातंत्र्यलढ्याला अनुकूल होती. ‘गोकुळ’चे संगीतकार होते सुधीर फडके. त्यांचे चित्रपटसंगीतात पहिले पदार्पण हे ‘गोकुळ’चे वैशिष्ट्य.
संगीतकार म्हणून सूत्रं हाती घेतली त्या वेळी सुधीर फडके म्हणतात, ‘‘महान संगीतकार गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव, केशवराव भोळे यांनी जे पद भूषवले, त्यावर बसताना मन आनंदाने भरून गेलं आहे. माझी जबाबदारी मोठी आहे आता.’’
खरोखर ‘गोकुळ’ची गाणी गाजली आणि पुढे संगीतकार, गायक म्हणून सुधीर फडके मोठे झाले. यानंतर मात्र १९४२चा लढा, क्रांतिकारक, भूमिगत अशा पार्श्वभूमीचे कथानक असलेले ‘सीधा रास्ता’, ‘अपराधी’ किंवा कुमारी मातेच्या सामाजिक समस्येवरील ‘आगे बढो’ हे चित्रपट ‘प्रभात’चा लौकिक राखू शकले नाहीत.