

Latur Municipal Election Result
esakal
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये राज्यात भाजपची घोडदौड असताना, लातूरच्या महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. वंचित बहुजन आघाडीचे समीकरण जुळवत आमदार अमित देशमुख यांनी महापालिकेत ७०पैकी ४३ जागा जिंकून बहुमत मिळविण्यात यश मिळवले. या यशाबद्दल ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी हरी तुगावकर यांनी अमित देशमुख यांची घेतलेली मुलाखत.
महाराष्ट्र व मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे योगदान कसे व किती राहिले?
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्र व मराठवाड्यासाठी किती योगदान राहिले आहे, हे सर्वांना माहीत आहे. मराठवाड्याला न्याय देणे, मागासलेपण दूर करणे, २१ टीएमसी पाण्याचा प्रश्न असेल, औद्योगिकीकरण, दळणवळण, रेल्वे, रस्ते, हवाई सेवा, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास असे कोणतेच क्षेत्र नाही, ज्याला विलासराव देशमुख यांचा स्पर्श झाला नाही. त्यांच्या कारकिर्दीत अगदी सत्तरच्या दशकापासून या भागाचा विकास करण्याचे काम त्यांनी सुरू केले. ते लातूरचे भाग्यविधातेच होते. त्यांच्या काळात लातूरने मागे वळून कधी पाहिले नाही. त्यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याची निर्मिती झाली. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ, बसस्थानक अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. मराठवाड्याला झुकते माप कोणाच्या काळात मिळाले असेल, तर ते त्यांच्या काळातच मिळाले. मराठवाड्याच्या विकासावर चर्चा व्हायला लागली. देश व राज्य पातळीवर ही चर्चा होऊ लागली, ती केवळ विलासराव देशमुख यांच्यामुळेच.