
मेहबूब आणि कारदार यांनी आपलं चांगलं बस्तान बसवले होते. मुस्लिम सोशल, तर कधी मुगल काळ जागवणारे ऐतिहासिक, तर कधी संगीतमय असे चित्रपट लोकप्रिय होते. या दोघांमध्ये नौशाद हे संगीतकार म्हणून समान सूत्र होतं. ‘फिल्मीस्तान’साठी सी. रामचंद्र लोकप्रिय गाण्यांचा खजिना घेऊन आले होते. ‘संग्राम’, ‘समाधी’, ‘सरगम’, ‘पतंगा’ अशी गाण्यांची हिट्परेड चालली होती. ‘फेमस’चे ‘प्यार की जीत’, ‘बडी बहन’मधून संगीतकार हुस्नलाल भगतराम हे सुरैय्याला घेऊन लोकप्रिय गाण्यांची मैफल जमवत होते.
कारदार यांचे ‘दर्द’, ‘दिल्लगी’, ‘दास्तान’ बहुचर्चित होते. त्या वेळी ‘सिंगिंग स्टार’ सुरैय्या हे एक बडं प्रस्थ होतं... मेहबूब खान ‘अनमोल घडी’, ‘अंदाज’मधून लोकप्रियतेचा झेंडा फडकवत होते. अशा वेळी नौशाद यांच्यासमोर दिल्लीहून आलेली एक विशी-बाविशीची मुलगी उभी राहिली. ‘मला गाणं म्हणायचं आहे; पण फक्त तुमच्याचकडे! दुसऱ्या संगीतकाराकडे मी जाणार नाही. तुम्ही नाही म्हणालात तर समोरच्या समुद्रात जीव देईन!’ असं ऐकल्यावर नौशाद यांनी तिला प्रथम खायला-प्यायला दिलं. तिची हकिकत जाणून घेतली.