esakal | शानदार प्राणी भारतात परततोय
sakal

बोलून बातमी शोधा

‘तो’ शानदार प्राणी भारतात परततोय}

पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी. मात्र भारतीय जंगलातून तब्बल ७० वर्षापूर्वी ‘तो’ लुप्त झाला. आता ‘त्या’ देखण्या आणि शानदार प्राण्याला पुन्हा भारतीय जंगलात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ‘त्या’च्या आगमनाने भारतीय जंगले समृद्ध होतील.

‘तो’ शानदार प्राणी भारतात परततोय

sakal_logo
By
संजय उपाध्ये

सध्या भारतीय जंगलात चित्त्याचे अस्तित्वच नाही. त्यामुळे भारत सरकारने जंगलात चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्यासाठी परदेशातून चित्ते आणले जाणार आहेत. सध्या आशियाई चित्ता हा आशिया खंडात केवळ इराणमध्ये तग धरुन आहे. काही वर्षापूर्वी इराणकडे चित्याच्या काही जोड्यांची मागणी भारत सरकारने केली होती. पण इराणने ही मागणी धुडकावून लावली. भारतात नामशेष झालेला चित्ता आणि इराणमध्ये सध्या अस्तित्वात असलेला चित्ता हे जैविकदृष्ठ्या बऱ्यापैकी एकच आहेत. त्यामुळे इराणमधील चित्त्यासाठी भारताचा अधिवास हा अतिशय योग्य आहे, असा शास्त्रज्ञांचा कयास होता. पण भारतात पुनर्वसनासाठी इराणने चित्ते देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारताने आता आफ्रिकेतील नामिबिया देशाकडे चित्त्याबाबत विचारणा केली आहे. त्यासाठी बोलणी सुरु असून ती यशस्वी झाली आहेत. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चित्याच्या चार ते सहा जोड्या भारतात दाखल होतील. हे चित्ते मध्यप्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात सोडण्याची जय्यत तयारी सुरु आहे.

७० वर्षापूर्वी शेवटचा चित्ता लुप्त
मध्यप्रदेशातील सरगुजा संस्थानचे महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांनी भारतातील शेवटचा आशियाई चित्ता मारला. ते वर्ष होते १९५२. आणि भारतीय जंगलातून शानदार आशियाई चित्ता कायमचा नामशेष झाला. लुप्त झाला. २०१८ मध्ये कुनो-पालपूर वन्यजीव अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देत तेथे चित्याचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला. हा महत्वाकांक्षी प्रकल्पाला पर्यावरण, वन आणि वातावरण बदल या खात्यातून अर्थपुरवठा करण्यात येणार आहे. चित्ते भारतात आणल्यानंतर सुरुवातीला त्यांना राजस्थानातील मुकुंदारा अभयारण्यातील मर्यादित, सुरक्षित भागात ठेवण्यात येतील.

भारतात १९५२ ला चित्ता नामशेष झाल्याचे जाहीर झाल्यानंतर जंगलात मोठे बदल झाले आहेत. सपाट प्रदेश तसेच विशाल गवताळ भाग हा चित्याचा अधिवासासाठी अतिशय उपयुक्त असा मानला जातो. पण चित्ता जसा संपला तसे गवताळ कुरणही संपत गेले. त्याची जागा झाडे, झुडपे, खुरटी वनस्पतींनी घेतली. त्यामुळे चित्त्यासाठी अनुकूल असा गवताळ प्रदेश निर्माण करण्याचे आव्हान सरकार आणि वनविभागासमोर आहे. पण आता कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानाबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आहे. कुनो-पालपूर उद्यान हे कोरडे आणि पानझडीचे जंगल आहे. चित्ता कुनोमध्ये तग धरु शकेल काय? त्याच्या खाद्याबद्दल काय? स्थानिक शिकारी प्राण्याबद्दल त्याचे कसे संबंध राहतील, असे अनेक प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. यासंदर्भात बोलताना कुनो उद्यानात गेली अनेक वर्षे संशोधन करणारे वन्यजीव जीवशास्रज्ञ फैयाझ अहमत खुदासर म्हणतात, ‘भारतात चित्ता आणणे ही एक चांगली गोष्ट आहे. पण कुनो उद्यान अजूनही चित्त्याच्या अधिवासासाठी पूर्णपणे तयार नाही. नोव्हेंबरपर्यंत या चित्याच्या जोड्या भारतात दाखल होतील. पण आता अवधी अतिशय कमी असल्याचे ते म्हणतात.

हेही वाचा: चीन-भारतातील ‘द लाँग गेम’

उद्यानात चारही ‘शिकारी’ असतील
कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात चित्ता सोडला आणि चित्त्याच्या ही योजना यशस्वी झाली तर तो एक जागतिक विक्रम होणार आहे. कारण त्यानंतर या उद्यानात सिंह, वाघ, बिबट्या आणि चित्ता ही मार्जार जातीतील चार मोठे शिकारी प्राणी एकाच उद्यानात पाहायला मिळणार आहेत. इतर शिकारी प्राण्याच्या तुलनेत चित्ता हा अतिशय छोटा प्राणी आहे. त्यामुळे चित्त्याला इतर शिकारी प्राण्याशी संघर्ष करावा लागणार आहे. आफ्रिकेतील जंगलात सिंह आणि तरस हे चित्त्याचे मुख्यतः शत्रू आहेत. त्याशिवाय बिबट्या हाही चित्त्याशी संघर्ष करत असतो. कोल्हा आणि गिधाड हे प्राणी मोठ्या शिकारी प्राण्यांना आकर्षित करतात. चित्ता हा मुख्यत्वे दिवसा शिकार करतो. तो दिनचरी प्राणी आहे. पहाटे आणि तिन्हीसांजेला मोठे शिकारी प्राणी शिकारीला जातात. त्यामुळे पहाट आणि तिन्हीसांजा या दोन्ही वेळा चित्त्यासाठी अतिशय धोक्याच्या असतात.

भारत आणि आफ्रिकेतील चित्ता एकच
जगभरातील जंगले आकसत गेल्याने प्राण्यांचा अधिवास कमी होत चालला आहे. साहजिकच आफ्रिकेत चित्त्याचा संघर्ष मानवाशी वाढतच चालला आहे. त्यामुळे भारतात चित्ते आणल्यानंतर त्यांच्यासाठी गवताळ कुरणे वाढवावी लागणार आहेत. त्यामुळे चित्त्याचा इतर मोठ्या शिकारी प्राण्यांशी संघर्ष कमी होईल. पण सत्तर वर्षापूर्वी आपण जर मागे गेलो तर चित्ता भारतात होता. भारतातील विविध म्युझियमध्ये असलेल्या चित्त्याच्या त्वचेतून घेतलेला डीएनए हा आफ्रिकेतील चित्याच्या डीएनएशी तंतोतंत जुळतो. त्याच्याआधारावर चित्ता हा भारतात टिकून राहील, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. काहींचे असे म्हणने आहे, की शंभर वर्षापूर्वी आफ्रिकेतील चित्ता हा भारतात असलेल्या चित्त्यासारखाच हुबेहूब होता. त्यामुळे कुनोमध्ये चित्ता एकजीव होऊन जाईल. कुनोमधून दोन प्राणी नामशेष झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे चित्ता आणि दुसरा हत्ती. पण आता निदान चित्त्याचे तरी पुनर्वसन करता येईल.

उद्यानात ‘सिंह’ ही येणार
मध्यप्रदेशच्या कुख्यात चंबळ खोऱ्यात कुनो तथा कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान तब्बल ७५० चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे. या उद्यानात बिबट्या, कोल्हे त्याबरोबच हरण, सांबर, नालगाय, चिंकारा, जंगली अस्वल, चौशिंगा हे प्राणी आहेत. मासांहारी पशुंसाठी हे उद्यान एक चांगले ‘कुरण’ आहे. या उद्यानात गुजरातच्या गीर अभयाराण्यातून ‘सिंह’ ही आणला जाणार आहे. सुरुवातीला गुजरातचा गीरमधील सिंह दुसरीकडे नेण्यास विरोध होता. ‘सिंह’ हा आमचा राज्याचा वारस असल्याचे सांगत मध्यप्रदेश पशुपक्षी, जंगल आणि उद्यानाच्या व्यवस्थानात फारच कमजोर असल्याची भूमिका घेतली होती. पण नंतर त्यात गुजरातने बदल केला.

पर्यटनाची होणार ‘धूम’
चित्त्याच्या पुनर्वसनानंतर मध्यप्रदेशातील या जंगल भागात पर्यटनाची धूम होणार आहे. कारण कुनो-पालपूर उद्यानापासून जवळच रणथंबोर व्याघ्र प्रकल्प आहे. तेथे वाघाला पाहण्यासाठी वर्षाला तब्बल चार-पाच लाख पर्यटक येतात. ते पर्यटकही कुनोला भेट देतील, असा कयास आहे. याबाबत ओरच्छा येथील अमर महल हॉटेलचे संचालक नितेंद्र सिंग राठोड म्हणाले, ‘पर्यटकांसाठी या भागात अतिशय कमी सुविधा आहेत. यासंदर्भात काही उद्योजक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी काम करत आहेत. चित्त्याच्या अगोदर गुजरातच्या गीर जंगलातील सिंह येथे दाखल होणार आहे. त्याशिवाय आता चित्ताही येथे दाखल होणार असल्याने निश्‍चितच पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

बारा वर्षानंतर प्रकल्प अस्तित्वात येणार
चित्ता पुनर्वसन प्रकल्प हा सर्वात अगोदर २००९ ला चर्चेत आला. तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी या प्रकल्पाला चालना दिली. पण त्यानंतर हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने जानेवारी २०२० ला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रकल्पा चालना मिळाली. यासंदर्भातील तांत्रिक समितीने काम सुरु केले आहे. भारतीय वन्यजीव संस्थेचे प्रमुख वाय. व्ही. झाला हे मुख्य संशोधक म्हणून काम पाहतात. राजस्थानचे आमदार भारत सिंग, मध्यप्रदेशाचे वन्यजीवाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान हे तांत्रिक समितीचे सदस्य आहेत. तांत्रिक समितीने चित्त्याच्या अस्तित्वासाठी काही शिफारशीही केल्या आहेत. चित्त्याच्या खाद्यासाठी हरीण आणि काळवीट जंगलात सोडणे, चित्ते जिथे सोडले जाणार त्या भागाला कुंपण घालणे, मानवाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी रस्त्यावर नाके उभारणे, रेल्वेमार्ग वेगळा करणे आदी कामे सुरु आहेत. सर्व काही व्यवस्थित झाल्यास या वर्षीच्या नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चित्ते कुनोमध्ये दाखल होतील.

पर्यायासाठी दोन अभयारण्ये राखीव
तांत्रिक समितीने चित्त्यासाठी कुनो-पालपूर शिवाय आणखी पाच अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानाची शिफारस केली आहे. राजस्थानातील मुकुंदारा व्याघ्र प्रकल्प आणि शेरगड अभयारण्य हे दोन तर मध्यप्रदेशातीलच माधव राष्ट्रीय उद्यान, नौरादेही आणि गांधीसागर वन्यजीव अभयारण्य अशी पाच ठिकाणे आहेत. पण कुनो हे सर्वार्थाने योग्य आहे. त्याबरोबरच गांधीसागर आणि भैन्सरोगड ही दोन अभयारण्ये पर्याय म्हणून ठेवली आहेत. कारण येथे गवताळ कुरणे, खुल्या जागेवर झाडे, नद्या आणि दऱ्या तसेच नैसर्गिक वातावरण आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारने एकत्रित काम करणे अपेक्षित असून दोन्ही राज्यातील साधारण २००० चौरस किलोमीटर इतका विशाल भूभागात चित्ता फिरु शकतो.

चित्त्यामुळे आजारही येणार?
आफ्रिकेच्या जंगलातील प्राण्यांत अनेक जीवघेणे आजार झालेले आहेत. आणि येथूनच जगभरही पसरले आहेत. सस्तन प्राणी वटवाघूळ आणि इतर प्राण्यांच्याद्वारे हे आजार इतरत्र पसरल्याची उदाहरणे आहेत. पण आता चित्त्यामुळे कोणते आजार येतील, हे आताच सांगता येणार नाही. पण त्याबाबत अगोदरच खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

हरीणच आवडते खाद्य
भारतीय जंगलाच्या विसाव्या शतकातील नोंदी पाहिल्या, तर भारतीय चित्त्याचे मुख्य खाद्य हे काळवीट, हरीण आहेत. काही वेळा चित्ता चितळ आणि नालगायींचीही शिकार केल्याच्या नोंदी दिसून आल्या आहेत. चित्त्‍यांचे अतिशय आवडीचे खाद्य असलेल्या हरीणांची (चिंकारा) संख्या २००४ मध्ये अतिशय चांगली होती. कुनोमध्ये त्यावेळी प्रति चौरस किलोमीटरमध्ये चार ते पाच हरणे होती. त्यानंतर दोन ते तीन वर्षांच्या काळात ही संख्या प्रति चौरस किलोमीटर सहा ते १० अशी झाली. काळवीटांचीही संख्या समाधानकारक होती.

हेही वाचा: श्रीलंका अर्थसंकटात?

२४ गावांचे स्थलांतर
कुनोमध्ये आशियाई सिंहाला सुद्धा आणण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक आणि बहुविधा कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी कुनोच्या जंगल भागातील तब्बल २४ गावांचे स्थलांतर केले गेले आहे. तसेच नागरिकांना घरे बांधून त्यांची सोयही केली आहे. सिंहाच्या खाद्यासाठी ‘सावज’ ही तयार ठेवले आहे. हरीण आणि इतर छोटे प्राण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. दरम्यान, उद्यानात राहणाऱ्या ‘सहारिया’ आदिवासी नागरिकांचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. ‘आम्हाला सिंहाच्या उद्यानासाठी उद्यानातून बाहेर काढण्यात आले. पण अजूनतरी येथे सिंह काही आला नाही. तो कधी येथे आणणार आहेत,’ असा सवाल ते करत आहेत.

चित्त्यासाठी गवताळ कुरण आवश्‍यकच
चित्त्यासाठी ८० टक्के भूभाग हा गवताळ असला पाहिजे. लांबपर्यंत उघडे जंगल हवे. सावजाचा पाठलाग करत शिकार करणे हे चित्त्याचे वैशिष्ट आहे. या गवताळ भागातच तो दडून बसतो. जंगलातील परिस्थितीशी रंगसंगती (केमॉफ्लॉज) मिळतीजुळती असल्याने तो लवकर दिसून येत नाही. पण घनदाट जंगल हे चित्त्याचे वसतीस्थान नाही. हे बिबट्यासाठी पोषक आहे. मोठी झाडे, झुडपे, खुरटी झाडे ही असली तरी गवताळ कुरण हे अनावश्‍यकच होऊन बसते. आफ्रिकेत सिंह आणि चित्यांमध्ये संघर्ष हा नित्याचाच आहे. आफ्रिकेत दर दहा चित्त्यापैकी एक चित्ता सिंहाकडून मारला जातो. पण कुनोमध्ये हेच प्रमाण दोन होण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक पाचपैकी एक चित्ता मारला जाण्याची शक्यता आहे.


जगभरात आता केवळ सात हजारच चित्ते शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी बहुतांश चित्ते हे दक्षिण आफ्रिकेतील देशांत आहेत. आफ्रिका खंडातील काही देशातील चित्त्यांची संख्या ही अशी ः
देश*चित्यांची संख्या
नामिबिया*३,५००
बोट्सवाना*२,०००
दक्षिण आफ्रिका*१,५००
झिम्बांब्वे*१६५
झांबिया*१००
मोझांबिक*५० ते ९०
मालावी*३० ते ५०

go to top