
डॉ. केशव स. देशमुख
स्वयंपाकघरातील चुलीभोवती तयार झालेली भाषिक संपन्नता महत्त्वाची आहे. बोलीची आशयघनता असलेले शब्दधन हे मराठीच्या शब्दसंस्कृतीला मिळालेले वरदानच होय. त्याचे जतन व्हायला हवे.
बोली काय अथवा भाषा काय, ती एकठायी अशी नसते. तिच्या उगमाचं अचूक स्थान सांगता येत नाही. तथापि,अनुमानानं भाषेचा शोध नोंदवता येतो. तशा नोंदी अनेक चिंतकांनी मांडून भाषेच्या वाटा दाखवलेल्या आहेत. पण हे अंतिम सत्य नव्हे. हा सत्याच्या दिशांचा शोध होय,असे खात्रीने सांगता येते.