

Love, Nature and the Changing Perspective of Life
esakal
सिद्धेश सावंत
प्रेमात पडल्यावर काय होतं..? पाऊस रोमॅन्टिक वाटतो. थंडी गुलाबी वाटते. गरमीमुळे जीव कासावीस होतो. चंद्र, ग्रह, तारे, ऋतू, झाडं, पक्षी, नद्या, समुद्र, आकाश, ढग, दिवस-रात्र कलाकृतीत उतरत राहतात. असं का असेल?
जसं प्रेमात पडणं नॅचरल आहे, तसंच प्रेमात पडल्यानंतर निसर्गाच्या जवळ जावं, असं वाटणंही. माणसाचं नॅचरल मॅन्युफॅक्चरिंगच तसं झालेलं आहे.
‘झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको’ असं चेष्टेने म्हटलं जातं; पण झाड ही निसर्गाशी जोडलेली गोष्ट. झाड सावली देतं. झाडाची सावली प्रेमाचं रूप. त्या मोबदल्यात झाड काही मागतं का? प्रेम म्हणजे देणं. निसर्गाचंही तेच. तो अविरत देत राहतो; पण घ्यायचं किती? याची मर्यादा मुळांकडे परतताना तीव्रतेने जाणवू लागली.
सध्या पैशांशिवाय जगणं मुश्किल झालं आहे. याला जबाबदार कोण, हा प्रश्न कधी विचारून पाहिलाय का? नाही! पैसे लागतातच. सगळ्यासाठी लागतात. पैशाने सुखं विकत घेता येतात का? सुख कशाला म्हणायचं? शहर सोडून गावी राहायला गेलं, तर तिथेही पैसे कमवावे लागतात... पण ते किती? याचं उत्तर शोधताना निसर्गाच्या अधिक जवळ आलो.