esakal | Titanic एक उद्‌ध्वस्त प्रेमाची अस्वस्थ कहाणी!

बोलून बातमी शोधा

Titanic story}
Titanic एक उद्‌ध्वस्त प्रेमाची अस्वस्थ कहाणी!
sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

"टायटॅनिक'चं नाव ऐकताच सर्वांना "टायटॅनिक' चित्रपट आठवतो. जगातील कोणत्याही व्यक्तीला टायटॅनिकबद्दल माहिती नसेल, असे क्वचितच पाहायला मिळेल. टायटॅनिक हे "त्या' काळातील सर्वांत मोठे जहाज होते. जेव्हा हे भव्य जहाज बांधले जात होते, तेव्हा इतर दोन जहाजेही त्याच्याबरोबर बांधली गेली; पण या टायटॅनिक जहाजाची बात ही कुछ और थी..! सर्व जहाजांमध्ये हे जहाज एक विशाल जहाज होते. टायटॅनिक जहाजाबद्दलची आणखी एक विशेष बाब म्हणजे, ते सर्वांत वेगवान चालणारे जहाज होते.

या भव्य टायटॅनिक जहाज आणि त्यावर घडणारी जॅक आणि रोझ यांची प्रेमकहाणी डोळे विस्फारायला लावते. लिनोनार्दो डिकॅप्रिओ आणि केट विंसलेट यांनी आपापल्या भूमिकांचे सोने केले आहे. ज्या जहाजावर ही कहाणी घडते, ते टायटॅनिक जहाज 14 एप्रिल 1912 रोजी बुडाले. हे जहाज कधीच बुडू शकत नाही, असा त्याच्या निर्मात्यांचा दावा होता. पण, नियतीच्या मनात काय असते ते कुणाला कळणार? एका हिमनगाला धडकून टायटॅनिक समुद्राच्या तळाशी गेले, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज जवळपास 100 हून अधिक वर्षांनंतरही टायटॅनिकबाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे.

सिनेमात दाखवल्याप्रमाणे टायटॅनिकवर खरोखरंच काही प्रेमकहाण्या घडल्या आहेत. त्यात इसीडॉर आणि त्याची पत्नी इडा यांची कहाणी प्रसिद्ध आहे. जेव्हा बोट बुडू लागली तेव्हा बायका आणि मुलांना सर्वप्रथम लाईफबोटमध्ये जाण्याची संधी दिली गेली. मात्र, इव्हा आपल्या पतीला सोडून जाण्यास तयार झाली नाही. सोबत जगलो, आता सोबतच मरू, असे तिचे म्हणणे होते. तिच्या हट्टामुळे इसिडॉरला लाईफबोटमध्ये आमंत्रित करण्यात आले, परंतु त्याने इतर महिला-बालकांना संधी मिळावी म्हणून ती ऑफर नाकारली. शेवटी त्या पती-पत्नीने एकत्रच मरण पत्करले. या घटनेवर टायटॅनिक सिनेमा बनवला गेला. या सिनेमाचे एकूण बजेट हे खुद्द टायटॅनिक जहाजापेक्षा कितीतरी जास्त होते. टायटॅनिक जहाज बनवायला 75 लाख डॉलर्स खर्च झाले होते, तर सिनेमा बनवायला 20 करोड डॉलर्स लागले. कमाईच्या बाबतीत टायटॅनिक सिनेमा जगात पहिल्या स्थानावर होता. नंतर आलेल्या "अवतार' सिनेमाने याचे रेकॉर्ड तोडले.

पण, हे जहाज इतके प्रसिद्ध का झाले? यामागेही इतिहास आहे. चला तर मग, टायटॅनिक जहाजाविषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात...

....तर जहाज समुद्रात बुडण्यापासून बचावलं असतं

टायटॅनिक जहाज बुडण्याच्या भयानक घटनेला 100 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत; पण लोकांच्या मनात आजही ती ताजी आहे. जेव्हा-जेव्हा एखाद्या जहाजाचा उल्लेख केला जातो, तेव्हा टायटॅनिकचं नाव नक्कीच घेतलं जातं. जगातील सर्वांत शक्तिशाली देशांपैकी एक नाव म्हणजे ब्रिटन. ब्रिटनमध्ये बांधलेलं हे टायटॅनिक जहाज त्या काळातील सर्वांत आलिशान आणि मोठे जहाज होते. टायटॅनिक 10 एप्रिल 1912 रोजी आपल्या पहिल्या प्रवासासाठी रवाना झाले अन्‌ हा प्रवास त्या जहाजाचा शेवटचाच ठरला.

टायटॅनिकचा पहिला प्रवास ब्रिटनहून न्यूयॉर्क (अमेरिका) असा होता, तो रूट जवळपास निश्‍चितही झाला होता. दरम्यान, 10 एप्रिल 1912 मध्ये टायटॅनिक न्यूयॉर्कच्या दिशेने रवाना होऊन इंग्लंडच्या दक्षिण हॅम्प्टनला जाऊन पोहोचले. या प्रवासादरम्यान टायटॅनिक जहाज फ्रान्समधील चेरबर्ग आणि आयर्लंडमधील क्वीन्सडाउन येथे थांबणार होते. पण, प्रवासाच्या चौथ्या दिवशी जेव्हा टायटॅनिक जहाज 600 किलोमीटरचा प्रवास करून न्यूफाउंडलॅंडला पोहोचले, तेव्हा त्याच दिवशी रात्री 11.40 वाजता हे जहाज एका भल्या मोठ्या हिमनगाला धडकले. मात्र, त्याचा परिणाम इतका जोरदार झाला की, जहाजाच्या हुलकाची पाने आत स्टारबोर्डवर आली आणि या भीषण अपघातात जहाजातील 16 जलरोधक दारांपैकी 5 दरवाजे समुद्राच्या दिशेने उघडली गेली. जहाजात जलद गतीने पाणी येऊ लागले अन्‌ सुमारे 2 तास 40 मिनिटांत हे जहाज पूर्णपणे बुडाले. "टायटॅनिक'च्या जलसमाधीने 1500 पेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला.

टायटॅनिक जहाज बुडाल्यामुळे 1500 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला. या जहाजात एकूण 1314 प्रवासी आणि 908 क्रू मेंबरसह एकूण 2 हजार 222 लोक होते. त्यापैकी केवळ 706 लोकांचे प्राण वाचू शकले, तर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 337 लोकांचेच मृतदेह समुद्रात सापडले. या जहाजात बुडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या पुरुषांचीच होती. दरम्यान, त्या रात्री लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लाईफबोटचा वापर केला जात होता. या बोटीत बसण्यासाठी स्त्रिया आणि मुलांना प्रोटोकॉलनुसार प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. लाईफबोट्‌समध्ये बसण्यासाठी प्रथम श्रेणी, द्वितीय आणि तृतीय अशी क्रमवारी केली जात होती. यात काही जणांचे प्राण वाचवण्यात लाईफबोटीला यश आले. तथापि, काही अफवांनुसार असेही म्हटले जाते, की टायटॅनिक जहाजाच्या तिसऱ्या श्रेणीतील प्रवाशांनाही लाईफबोटपर्यंत पोहोचण्यासाठी थांबविण्यात आले होते. याशिवाय जहाजातील 9 कुत्र्यांपैकी 2 कुत्रीही यात वाचली होती.

...तर टायटॅनिक अपघातात 1178 लोकांचे वाचले असते प्राण?

टायटॅनिक जहाज बुडाल्यामुळे दीड हजाराहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. परंतु, काही गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या असत्या, तर 706 च्या जागी 1178 लोकांचे जीव वाचले असते. टायटॅनिक जहाज अशा प्रकारे डिझाईन केले गेले होते, की 64 लाईफबोट वाहून नेऊ शकतील, परंतु केवळ 20 लाईफबोट्‌स यातून वाहून नेण्यात आल्या, जे जहाजातील सुमारे 2 हजार 222 लोकांना वाचवण्यासाठी पुरेसे नव्हते. एका अंदाजानुसार, लाईफबोट पूर्णपणे भरली असती, तर सुमारे 1178 लोक बुडण्यापासून वाचू शकले असते. याचे आणखी एक कारण असे की, काही लोकांनी लाईफबोट संपूर्ण भरली नाही, त्या बोटीला रिकामी परत नेण्यात आलं, यामुळे काही लोकांचे जीव वाचू शकले.

"टायटॅनिक'वर बनला "टायटॅनिक' चित्रपट

जगातील सर्वांत मोठे जहाज बुडाल्यानंतर 1997 मध्ये "टायटॅनिक' हा चित्रपट बनवला गेला आणि जहाज बुडण्याच्या सुमारे 100 वर्षांनंतर 2012 मध्ये पुन्हा हा चित्रपट 3D च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

"टायटॅनिक'शी संबंधित काही अफवा आणि मिथकं

"हे जहाज कधीही बुडू शकत नाही'

टायटॅनिक जहाजाबद्दल लोकांचा असा दावा होता, की व्हाइट स्टार लाइन या जहाज बांधणाऱ्या कंपनीने, "हे जहाज कधीही बुडू शकत नाही', असे म्हटले होते. पण, लंडनच्या किंग्ज कॉलेजच्या रिचर्स हॉवेल्सने त्यास टायटॅनिकविषयीची सर्वांत मोठी समज दिली.

कॅप्टन एडवर्ड जे. स्मिथ "टायटॅनिक' बुडण्यास जबाबदार?

टायटॅनिकचे कॅप्टन एडवर्ड जे. स्मिथ याच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि, आईसबर्गच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत आणि जहाजाची गती कमी न करण्याची चूक असूनही, तो एक नायक म्हणून पाहिला जाऊ शकतो. काही तज्ज्ञ टायटॅनिक चित्रपटात दर्शविलेल्या कॅप्टनची प्रतिमा चुकीची मानतात. ते म्हणतात की, टायटॅनिक जहाजात किती लोक बसले आहेत, किती लाईफबोट्‌स आहेत हे त्यांना माहीत होतं, परंतु तरीही ते पूर्ण भरले नसले, तरी त्यांनी होड्या सोडल्या. तसेच, कॅप्टन एडवर्डला टायटॅनिकच्या प्रवाशांना होणाऱ्या धोक्‍याबद्दल कोणतीही माहिती न दिल्यामुळे त्यांना दोषी ठरवले गेले. लंडनमधील राष्ट्रीय समुद्री संग्रहालयाच्या जॉन ग्रेव्सच्या म्हणण्यानुसार, 14 एप्रिल 1912 च्या टायटॅनिक अपघाताच्या दिवशी कॅप्टन स्मिथ कुठे बेपत्ता झाला, हे अद्याप कोणालाही समजले नाही.

जहाज बुडत असताना वाजला "बॅंड'

टायटॅनिक या प्रसिद्ध चित्रपटाच्या एका दृश्‍यात जहाज बुडताना प्रवाशांचे मनोधैर्य राखण्यासाठी प्रार्थना करणारे एक बॅंड दाखविण्यात आले आहे. यासह यात बॅंडचे सात संगीतकार अपघातात ठार झाल्याचेही दाखविण्यात आले. दरम्यान, या बॅंडचे शेवटचे गाणे कोणते होते, याची कोणालाही कल्पना नव्हती.

टायटॅनिक बनविणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध चुकीची "अफवा'

टायटॅनिक बनवणाऱ्या कंपनीचे मालक जे. ब्रूस यांच्याबद्दल बऱ्याच चुकीच्या अफवा आणि खोट्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. जे. ब्रूस यांच्याबद्दल असे म्हणतात, की त्यांनी महिला, मुले आणि चालक दलाच्या सदस्यांना वाचवण्यापूर्वी आपला जीव वाचवण्यासाठी लाईफबोटचा वापर केला, असा त्यांच्यावर आरोप केला गेला. काही लोक या आरोपांची जुनी वैमनस्यता असल्याचे सांगतात. अमेरिकन वृत्तपत्राचे मालक विल्यम रॅन्डॉल्फ हर्स्ट यांचे ब्रूससोबत वैर असल्याचेही बोलले जाते.

तृतीय श्रेणीतील प्रवाशांना बोटीत जाण्यापासून थांबवलं

चित्रपटाच्या एका दृश्‍यानुसार, टायटॅनिक बुडत असताना लाईफबोटीचा वापर प्रवाशांना वाचवण्यासाठी केला जात होता. मात्र, जहाजातील तृतीय श्रेणी प्रवाशांना लाईफ बोटपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जात होते. प्रत्यक्षात याकरिता कोणतेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. तथापि, अमेरिकन कायद्यानुसार अमेरिकेत कायमचं वास्तव्य असणाऱ्या प्रवाशांना पहिले प्राधान्य दिलं गेलं आणि नंतर परदेशी प्रवाशांना. त्याचबरोबर संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी टायटॅनिक जहाजात असलेल्या तृतीय श्रेणी प्रवाशांना इतर प्रवाशांपासून वेगळं ठेवण्यात आलं. टायटॅनिक जहाजाच्या तृतीय श्रेणीतील बहुतेक प्रवासी रशिया, चीन, ब्रिटन, सीरिया आणि इटलीचे होते, जे चांगल्या आयुष्याच्या शोधात अमेरिकेत जात होते.

"टायटॅनिक'विषयीच्या काही रंजक गोष्टी

-टायटॅनिक जहाज सर्वांत मोठे आणि त्या काळातील सर्व सुविधांनी सुसज्ज होते, जे सुमारे 2 वर्षे, 2 महिन्यांत पूर्ण झाले. याची सुरवात सुमारे 3000 लोकांच्या पथकाने केली होती.

-या बांधकामादरम्यान 2 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर सुमारे 246 लोक गंभीर जखमी झाले. हे जहाज 31 मे 1911 रोजी पूर्ण झाले होते.

-टायटॅनिक जहाजात सुमारे 63 हजार लिटर पिण्याचे पाणी, 40 टन बटाटे, 1590 किलो कांदे, 40 हजार अंडी इत्यादींचा वापर करण्यात आला.

-टायटॅनिक हे जगातील एकमेव जहाज आहे, जे आईसबर्गच्या हिमनगाच्या धडकेत बुडाले. जेव्हा टायटॅनिकच्या अधिकाऱ्यांनी आईसबर्गला पाहिले, तेव्हा प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे फक्त 37 सेकंद शिल्लक राहिले होते.

-हिमनग दिसू लागताच जहाज डावीकडे वळवण्यात आले, पण हिमखंड टाळण्यासाठी ही कारवाई पुरेशी नव्हती. जर याबद्दल 30 सेकंदांपूर्वी माहिती मिळाली असती तर टायटॅनिकला वाचवता आले असते.

-1 सप्टेंबर 1985 रोजी जहाज बुडाल्याच्या सुमारे 73 वर्षांनंतर टायटॅनिकचे काही तुकडे सापडले.

-जगातील सर्वांत मोठे जहाज बुडल्यामुळे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. कारण, त्यात प्रवास करणारे सर्वात श्रीमंत लोक इंग्लंडचे होते.

-टायटॅनिक बुडालेल्या ठिकाणी पाण्याचे तापमान सुमारे 2 डिग्री सेल्सिअस होते, ज्यामध्ये कोणताही मनुष्य 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही.

-टायटॅनिक जहाजाची किंमत 75 दशलक्ष डॉलर्स इतकी होती, परंतु टायटॅनिक चित्रपटाची किंमत अंदाजे 20 करोड डॉलर्स इतकी आहे. जहाजाच्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त. त्याच वेळी टायटॅनिक चित्रपटाने 11 ऑस्कर जिंकले.

-टायटॅनिक जहाज बुडण्याची वेदनादायक घटना लोकांच्या मनात कायम राहील. समुद्रात बुडणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या जहाजांमध्ये या जहाजाचा दुसरा क्रमांक लागतो.

टायटॅनिक जहाज कसे बुडाले?

बऱ्याच जणांनी "टायटॅनिक' चित्रपट पाहिला असेल तर त्यांना माहिती असेल ही घटना कशी झाली होती; परंतु ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूयात. टायटॅनिक जहाज बनवल्यानंतर त्या जहाजाची पहिली यात्रा ही ब्रिटनच्या साउथैम्पटन बंदरापासून न्यूयॉर्कसाठी रवाना होणार होती आणि ते 10 एप्रिल 1912 ला दुपारच्या वेळेला रवाना झालीही, तेही हजारो प्रवाशांना घेऊन. परंतु, 14 एप्रिल 1912 च्या रात्री या जहाजाची टक्कर उत्तर अटलांटिक महासागरातील एका मोठ्या हिमखंडाशी झाली आणि हे जहाज दोन तुकड्यांमध्ये तुटून पडले. या जहाजाचे तुकडे खाली 3.8 किलोमीटर पर्यंत जाऊन समुद्रात सामावून गेले. या समुद्रात झालेल्या घटनेत त्या जहाजातील जवळ जवळ 1500 लोक मरण पावले होते. या घटनेनंतर 70 वर्षे टायटॅनिक जहाज समुद्रात तसेच पडून होते. त्या जहाजाचे अवशेष समुद्रात पडलेले होते. त्यानंतर रॉबर्ट बलार्ड आणि त्यांच्या टीमने सर्वांत आधी 1985 साली या जहाजाच्या अवशेषांना समुद्रात शोधून काढले होते.

जहाजाचे अवशेष सापडले, तर त्यांना आजपर्यंत बाहेर का काढले गेले नाही?

हा लेख वाचताना आपल्या मनात सुद्धा हा प्रश्न निर्माण झाला असेल की, जर जहाज कोणत्या ठिकाणी बुडाले होते आणि त्याचे अवशेष सापडले तर त्यांना आजपर्यंत बाहेर का काढले नाही? तर आपल्या माहितीसाठी, जेव्हा रॉबर्ट बलार्ड यांनी आणि यांच्या टीमने या जहाजाच्या तुकड्यांचा शोध लावला तेव्हा ही माहिती समोर आली की, ज्या ठिकाणी जहाज बुडाले होते त्या पाण्यात खाली गेले तर तापमान हे 1 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते.

म्हणजे जर एखादी व्यक्ती पाण्यात खाली 4 किलोमीटरपर्यंत मोठ्या मेहनतीने पोहचली तरीही ती व्यक्ती बाहेर येणे खूप कठीण आहे आणि जहाजाचे तुकडे बाहेर काढणे त्यापेक्षाही कठीण. म्हणजेच, जहाजाचे अवशेष चार किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये जाऊन बाहेर काढणे जवळजवळ अशक्‍यच आहे. म्हणून आजपर्यंत कोणीही त्या जहाजाच्या तुकड्यांना बाहेर काढू शकले नाही. आता असेही म्हटले जाते की, समुद्रात जास्त दिवस टायटॅनिकचे तुकडे राहू शकत नाही, कारण जहाजाचे तुकडे समुद्राच्या पाण्यामुळे विरघळत आहेत. त्या क्षेत्रातील काही मान्यवरांचे असेही म्हणणे आहे, की येणाऱ्या 20-30 वर्षांत जहाज पूर्णपणे समुद्रात सामावून जाईल. जहाजाचा कोणताही अवशेष पुन्हा दिसणार सुद्धा नाही.