तुम्ही स्कॅन करता, त्या क्यूआर कोडमध्ये असतं तरी काय?
कुठल्याही दुकानात जा, मॉलमध्ये खरेदी करा, भाजी घ्या किंवा टपरीवर. जा प्रत्येक ठिकाणी एका प्लॅस्टीकच्या कव्हरमध्ये आडव्या उभ्या, वाकड्या तिकड्या रेषांचे जाळे असलेले स्टीकर अथवा एक छोटीशी स्टॅंडी दर्शनी भागावर लावलेली किंवा विराजमान झालेली दिसणे, हे चित्र आज सार्वत्रिक दिसत आहे. संबधित दुकानात, मॉलमध्ये अथवा एखाद्या छोट्याशा ठेल्यावरचा आपला खरेदीविक्रीचा व्यवहार झाला की खिशात हात घालून वॉलेट काढून पैसे द्यायचे, हे चित्र आता दुर्मिळ झाले आहे. आता सरळ मोबाईल काढा, तो ऑन करा, स्कॅन करा. झाले काम. खिशात पैसे आहेत की नाही याचे टेन्शन नाही ना चिल्लरचे टेन्शन नाही. नोटबंदीनंतर देशात कॅशलेश व्यवहाराचा नारा दिला गेला व कधीही माहित नसलेला क्यूआरकोड हा नवा शब्द प्रत्येकाच्या तोंडात फिट बसला. पण या क्यूआर कोडमध्ये असते तरी काय? तो कसा तयार केला जातो? त्याचा वापर कसा होतो, याचा रंजक इतिहास आहे.
तसे पाहिले तर, क्यूआर कोड म्हणजे एक सांकेतिक भाषा आहे. जी प्रत्येकाला कळत नाही. पण, विशिष्ठ मशिनलाच वाचता येते. जुन्या काळात राजे महाराजे हेर नियुक्त करत. हे हेर शत्रूच्या राज्यात जाऊन गुप्त माहिती काढत, कधी कधी हे हेर पकडले जाऊन त्यांना शिक्षा केली जात असे. मात्र, मिळलेली माहिती आपल्या राजापर्यंत पोचविण्यासाठी सांकेतिक शब्द वापरत. छत्रपती शिवाजी महाराजांकडे बहर्जी नाईक हे प्रसिद्ध हेर होते. शत्रूच्या गोटात जाऊन माहिती काढण्यात त्यांचा हातखंडा होता. गुप्त माहितीच्या आधारावर लढाया होत. गुप्त माहितीची धागाच क्यूआरकोडच्या संकल्पनेमागचे सूत्र आहे. अनेकवेळ गुप्तहेर शत्रूच्या हाती लागून त्यांना कैद केले जात होते. मात्र, मिळविलेली माहिती सांकेतिक शब्दातून ते आपल्या राजाला पोचवत असत. अशाच प्रकारची पद्धत ही क्यूआर व बार कोडमध्ये आहे. मात्र, आधुनिक काळात त्याचा वापरबदलला आहे.
देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संगणक शास्त्राचे प्रोफेसर डॉ. डी. व्ही काळे यांनी सांगितले की, क्यूआरकोडची संकल्पना सर्वप्रथम सुचली अमेरिकेच्या बर्नाड सिल्व्हर आणि नॉर्मन वूडलॅड यांना. क्यूआर कोड पूर्वी बारकोडचा वापर केला जात होता. १९७४ मध्ये रिग्लेज च्युईंगमच्या पाकिटावर प्रथम बारकोडचा वापर करण्यात आला. सुरुवातीला बारकोडचा वापर हा अन्न आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सुपरमार्केटमधील वितरण व्यवस्थेसाठी करण्यात येत होता. मात्र सध्या तुम्ही कोणत्याही छोट्या दुकानात, पानपट्टीवर, चहाच्या ठेल्यावर जा तिथे क्यूआर कोड लावलेला दिसतो. मॉलमध्ये किंवा संगणकीकृत बिलिंग व्यवस्था असलेल्या ठिकाणी बिलिंगच्या वेळी हा कोड एका उपकरणातून स्कॅन केला जातो. स्कॅन केल्यानंतर त्या वस्तूची किंमत आणि इतर माहिती संगणकाला मिळते. त्यामुळे कितीही मोठी यादी असली तरीही बारकोड स्कॅन करून संगणक त्या वस्तूंचे मूल्य इतर माहितीची सांगड घालून बील आपल्या समोर ठेवतो. सर्व छोट्या मोठ्या खरेदी-विक्रीच्या ठिकाणी कॅश काउंटरवर पेमेंटसाठी क्यूआर कोड डिसप्ले दिसून येते. हे क्यूआर कोड संबंधित व्यावसायिकाने त्याच्या बँकेकडून किंवा भीम, यूपीआय ॲपद्वारे जनरेट करून घेतलेले असतात.
जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बारकोड म्हणजे आकड्यांचे असे रुपांतर असते जे आपल्याला वाचता येणार नाही पण संगणकासारखे मशीन ते वाचू शकते. काळ्या पांढऱ्या रेषांचा प्रत्येकी एक आकडा दर्शवणारा हा संच असतो. बारकोडमध्ये वस्तूबद्दलची माहिती जसे की वस्तूचे वजन, उत्पादनाची तारीख, उत्पादन क्रमांक, साखळी नंबर, बॅच नंबर ई. संकलित केलेली असते. यामुळे वितरण, साखळीतील वस्तूची ओळख व मार्गक्रमण यांचे जलद वाचन संगणकाला सुलभ होते. बारकोडमध्ये वगवेगळ्या रुंदीच्या समांतर रेषा असतात. त्या समांतर रेषांमध्ये आणि त्यांच्या मधल्या जागेत आवश्यक ती माहिती साठवलेली असते. एका बारकोडला ९५ ब्लॉक असतात. त्या ९५ पैकी १२ ब्लॉकमध्ये बारकोड लिहिला जातो. त्यापैकी तीन ब्लॉक हे लेफ्ट गार्ड, सेंटर गार्ड आणि राईट गार्ड या नावाने ओळखले जातात. बारकोड वाचण्यासाठी असणाऱ्या स्कॅनिंग मशीनमध्ये लेझर लाईटचा वापर केलेला असतो. हे मशीन डावीकडून उजवीकडे अशा क्रमाने बारकोड वरच्या रेषा वाचत जाते. हे मशीन वाचलेल्या रेषांच्या रूपातली माहिती बायनरी कोडमध्ये रुपांतरीत करते. संगणक फक्त ही बायनरी रुपात असलेली माहिती वाचू शकतो आणि हीच माहिती तो स्क्रीनवर दाखवतो. बार कोडच्या सुरूवातीचे पाच अंक निर्माता कंपन्यांचा आयडी क्रमांक असतो. पुढचे पाच अंक संबंधित उत्पादनाची संख्या असते. हा बारकोड एकमितीय आणि द्विमितीय असतो. एकमितीय बारकोडचा उपयोग किराणा माल, कमी किमतीच्या वस्तू जसे की पेन, इलेक्ट्रोनिक गोष्टी इत्यादींवर केला जातो. द्विमितीय आणि एकमितीय बारकोड मध्ये फारसा फरक नसतो. त्यातला मुख्य फरक हा की दोघांना समान जागा लागत असेल तर एकमितीय पेक्षा द्विमितीय बारकोडमध्ये तुलनेने जास्त माहिती साठवता येऊ शकते. बारकोडचे १९५१ मध्ये अमेरिकेत पेटंट केले. हा शोध मोर्स कोडवर आधारित होता, जो पातळ आणि जाड पट्ट्यांवर आधारित होता. पुढे त्यात संशोधन होत गेले व त्याचा व्यावसायिक वापर सुरू होण्यासाठी तब्बल २० वर्षे लागली.
बारकोडचे फायदे
- माहितीचे अचूक व जलद संकलन
- उत्तम ट्रॅकिंग यंत्रणा (जगभरात कुठेही)
- वेळेची बचत (वस्तूंची यादी करणे)
- कमी मनुष्यबळ
- कमीत कमी चुका, त्रुटी
जपानने केला पहिल्यांदा वापर
क्यूआर कोडचा वापर सर्वप्रथम जपानच्या कंपन्यांतर्फे करण्यात आला होता. क्यूआर या इंग्रजी आद्याक्षरांचा अर्थ 'क्विक रिस्पॉन्स' अर्थात त्वरीत प्रतिसाद असा आहे. यात चौरस किंवा आयताकृती रचना असून त्यात द्विमितीय चिन्हे किंवा भूमितीय आकारांचा वापर केला जातो. संबंधित माहिती त्वरेनं वाचता यावी यासाठी या कोडची निर्मिती करण्यात आली. क्यूआर कोड हे बारकोडचं अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच आधुनिक आवृत्ती आहे. विशेष अथवा गुप्त माहिती सांकेतिक शब्दांत बदलण्यासाठी क्यूआर कोडचा उपयोग केला जातो. याचा उपयोग स्मार्ट फोनवर विविध प्रकारची माहिती मिळविण्यासाठी केला जातो. क्यूआर कोडमध्ये एखादे उत्पादन तयार झालेली तारीख, एक्स्पायरी डेट आदी माहिती सुद्धा स्टोअर केलेली असते. विविध प्रकारच्या वस्तूवर क्यूआर कोड असतो. क्यूरआर कोड वाचण्यासाठी क्यूोआर कोड रीडर ऍपचा वापर करण्यात येतो. आज वैद्यकीय सेवा, खाद्यपदार्थ, पुस्तके, कपडे, संरक्षण सामग्री, ऑटोमोबाईल अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये बारकोडचा वापर केला जातो. आजकाल जागतिकीकरणामुळे जगभरातील विविध खाद्यपदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक बारकोडमधून संख्या आणि त्यामधून माहितीचे संकलन केले जाते आणि ही माहिती संगणकीयकृत प्रणालीतून वापरली जाते. त्यामुळे मानवी श्रम कमी झाले आहेत. क्यूआर कोड 'ऑनलाइन क्यूआर कोड जनरेटर टूल'चा वापर करू तयार केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.