
जैन हा अहिंसावादी विचारसरणीचा समाज. ‘महादेवी हत्तीण’ प्रकरणावरून नांदणी मठ राज्य आणि देशात चर्चेत आला आहे. जैन धर्मियांची धार्मिक परंपरा आणि महादेवी हत्तीण यांचे नाते अतूट होते. कोणत्याही धार्मिक कार्यात हत्तीणीची उपस्थिती म्हणजे धार्मिक कार्याला मिळालेली झळाळी ठरत असे. महादेवी हत्तीण आणि नांदणी मठ यांच्यात भावनिक नाते निर्माण झाले होते. तेराशे वर्षांचा धार्मिक इतिहास असणाऱ्या नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ संस्थांनचे हत्तीपर्व न्यायालयाच्या निकालानंतर संपुष्टात आले. संस्थांच्या इतिहासातील ‘महादेवी’ ही तिसरी हत्तीण ठरली. सर्वधर्मीयांच्या धार्मिक उत्सवांमध्ये आता ‘महादेवी’ची उणीव प्रकर्षाने भासणार आहे. तिचा डामडौल, राजेशाही थाट, सर्वधर्मीयांच्या उत्सवांमध्ये सहभागामुळे मिळणारी ऊर्जा, मिळणारा आशीर्वाद, मुलांमधील विशेष आकर्षण आठवणीपुरतेच शिल्लक राहणार आहे. नांदणी मठसंस्थांच्या ‘महादेवी हत्तीणी’च्या विरहाने नांदणीबरोबरच मठ संस्थांच्या ७४३ गावांमध्ये उद्विग्नता निर्माण झाली आहे.
‘महादेवी’ने महाराष्ट्र, कर्नाटकातील पंचकल्याण पूजा महोत्सवांबरोबरच सर्वधर्मीयांच्या उत्सवांमध्ये आवर्जून उपस्थिती लावून आपलेपणाची भावना निर्माण केली होती. कर्नाटकातील जंगलातून महादेवी वयाच्या सहाव्या वर्षी नांदणी मठ संस्थानात दाखल झाली. गेल्या ३२ वर्षांपासून तिने पंचक्रोशीत आपुलकीची भावना निर्माण केली. नांदणी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरढोण याबरोबरच परिसरातील गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस तरी तिचे हमखास दर्शन व्हायचे. तिच्याकडून डोक्यावर सोंड ठेवून कृतज्ञतापूर्वक आशीर्वाद दिला जायचा. नांदणीच्या निषेदिकेवर चोवीस तीर्थंकरांच्या दर्शनानंतर श्रावक आणि भाविक हमखास ‘महादेवी’चे दर्शन घेत.