
मंगेश तिटकारे, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे
राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था व बचत गट यांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यांचे प्रकल्प उभारणी, विस्तारीकरण आणि पुनर्वसन, अर्थसाह्य, दीर्घ मुदत कर्ज, अल्पमुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज इ. स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून निधीची उभारणी, व्यापार वृद्धिसाठी प्रशिक्षण, उत्पादित माल आणि विपणनासाठी भागीदारी आणि कंपनीसाठीचे भागभांडवल करार आदींसाठी महामंडळ कटिबद्ध आहे.
जागतिकीकरणानंतर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रास अस्तित्वासाठी तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बरोबर करावी लागणारी स्पर्धा करण्यासाठी गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. राज्यामध्ये सहकार क्षेत्रात विविध प्रकारच्या सव्वा दोन लाखांच्या वर सहकारी संस्था आहेत. त्यात ग्रामीण पातळीवरील प्राथमिक किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी पतपुरवठा संस्था यांची संख्या २१,०९७ इतकी आहे.