
युगांक गोयल, कृती भार्गव
नुकताच फेब्रुवारी महिन्याचा ग्राहक दर निर्देशांक (सीपीआय) जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाईचा दर मर्यादित असून, अन्नधान्याची दरवाढही नियंत्रणात दिसून आली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील स्थिती आणखी आश्वासक आहे. राज्यातील महागाईच्या नीचांकी दरामुळे राज्याला आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आणि दीर्घकालीन उद्दिष्टांच्या दिशांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळणार आहे.
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने १२ मार्च २०२५ रोजी फेब्रुवारी महिन्यासाठीचा ग्राहक दर निर्देशांक (सीपीआय) जाहीर केला. या मंत्रालयाकडून दर महिन्याला ही आकडेवारी जाहीर करण्यात येते. त्यातून प्रत्येक महिन्याला दरांमध्ये कसे बदल होतात, हे लक्षात येते. त्यातून आर्थिक नियोजन आणि वित्तीय धोरण निर्णयांविषयी निर्णय घेता येऊ शकतो.