
कठोर निर्णय टाळण्यासाठी वय चोरी करणारे खेळाडू कागदपत्रांचे कागदी घोडे पुरावे म्हणून नाचवतात. स्वच्छ प्रशासनाचे दाखले देणाऱ्या संघांकडूनही हे वय चोरणारे खेळाडू अजूनही खेळताना दिसतात. या प्रकाराला आळा घालणे खूप मोठे कठीण आव्हान आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर निर्णय घेण्याची तयारी दाखवलीत तरच या गंभीर परिस्थितीतून कदाचित मार्ग काढता येईल.
मी सुनंदन लेले. महाराष्ट्राचा माजी खेळाडू आहे. आणि कर्मधर्म संयोगाने आता पत्रकार आहे. सर्वप्रथम आपण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा कारभार हाती घेतल्यापासून घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयांचे स्वागत करतो. महाराष्ट्र प्रिमिअर लीग अगोदर चालू झाली होती; पण आपल्या कार्यकाळात त्याचे स्वरूप भव्य झाले. संघमालकांनी कोट्यवधी रुपयांची बोली लावून स्पर्धेत मोठ्या उत्साहाने आपापले संघ दाखल केले. गेल्या दोन वर्षांत याच नव्या स्वरूपातील एमपीएल स्पर्धेने रंग भरला आहे. तिसऱ्या वर्षात अदाणीसारख्या मोठ्या उद्योग समूहाने स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व घेतले आहे. यातूनच स्पर्धा करत असलेल्या प्रगतीची निशाणी मिळते आहे.