

Youth Mental Health
esakal
आरती बनसोडे - bbansodeaarti@gmail.com
एका आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी साधारण १,७०० ते १,८०० विद्यार्थी आत्महत्या करतात. स्वतःचा जीव देणे कितपत योग्य आहे? आयुष्यात आपल्याला हवी ती प्रत्येक गोष्ट मिळेलच, असे नाही. कधी तरी ‘नकार’ पचवायलाच लागतो... पण ‘नकार’ म्हणजे ‘पूर्णविराम’ नाही, तर तो एका नवीन सुरुवातीचा ‘स्वल्पविराम’ असू शकतो. आयुष्य खूप सुंदर आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी किंवा परिस्थितीसाठी ते संपवणे हा पर्याय असूच शकत नाही. तरुणांनो, जिद्दीने जगा!
मुंबई उच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या एका सुनावणीदरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. ताज्या माहितीनुसार भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी साधारण १,७०० ते १,८०० विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. याचा अर्थ असा, की सरासरी दर महिन्याला १४० ते १५० विद्यार्थी आपले जीवन संपवत आहेत. एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने लोकलमध्ये झालेल्या भाषेच्या वादावरून आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीमुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. आपल्या प्रियकराचे लग्न झाले ही गोष्ट सहन न झाल्यामुळे नर्सिंग शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले. त्याशिवाय पुणे शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. वडाळ्यातील २४ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी आपले जीवन संपवले. तिने सहा पानांची सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या मानसिक छळाचा उल्लेख केला होता.