
डॉ. सुभाष साळुंके
महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य आहे. आरोग्य क्षेत्राचा विचार केला, तर राज्याची परिस्थिती तितकी आश्वासक नाही. सरकारी आरोग्य यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज असून, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांवर नियंत्रण आणण्यासाठीही कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.
नागरिकांचे आरोग्य ही वैयक्तिक बाब नसते, तर ती राष्ट्रीय जबाबदारी असते. त्यामुळेच, प्रत्येक सरकारने आरोग्य विभागाला सर्वोच्च प्राधान्य देणे, ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राचा विचार करताना, माता मृत्यू, बालमृत्यू, स्त्री-पुरुष गुणोत्तर अशा वेगवेगळ्या निकषांवर या क्षेत्राची कामगिरी तपासली पाहिजे. काही निकषांवर महाराष्ट्राची परिस्थिती निश्चितच चांगली आहे. मात्र, आरोग्य सुविधा आणि त्यामधील सरकारचा सहभाग, सरकारचा दृष्टिकोन या गोष्टी पाहिल्या, तर राज्याची आरोग्याची स्थिती पाहिजे तितकी समाधानकारक नाही, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. सध्याच्या व्यवस्थेमध्ये सुधारणेच्या प्रचंड संधी आहेत. त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि बदलत्या परिस्थितीचा विचार करताना नव्याने आरोग्य विभागाकडे पाहण्याची गरज आहे. यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची.