
आदिती स्वामी हिने लहान वयामध्ये तिरंदाजी या खेळामध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. नऊ वर्षांची असताना तिची पहिल्यांदाच तिरंदाजी या खेळाची ओळख झाली. पालकांसोबत शाहू स्टेडियमला गेली असताना विविध खेळांच्या शिबिरामध्ये आदितीला तिरंदाजीबद्दल आवड निर्माण झाली. लाकडी धनुष्य, बाण यांचे तिला आकर्षण वाटू लागले. त्यामुळे तिरंदाजी या खेळाकडे ती वळली; पण त्यावेळी तिथे कमी खेळाडू तिरंदाजी या खेळाचे प्रशिक्षण घेत होते. तसेच तिरंदाजीला पोषक अशा सुविधाही उपलब्ध नव्हत्या.
प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिती हिने तिरंदाजीचे बाळकडू आत्मसात केले. प्रवीण सावंत यांनी नव्या मैदानात खेळाडूंना तिरंदाजीचे मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्येच आदिती तिरंदाजीचा सराव करीत होती. सहावीपासून ती या खेळाचे सामने खेळू लागली; मात्र १४ वर्षांखालील स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आदिती या खेळाकडे गांभीर्याने बघू लागली. यानंतर तिने मागे वळून बघितले नाही.