
ओमप्रकाश ऊर्फ काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनला पतसंस्थांचे अनेक प्रश्न सोडविण्यात यश मिळाले. परंतु काही प्रश्न अनुत्तरित आहेत. राज्य सरकारने थकबाकी वसुली कायदा गतिमान करणे, पतसंस्थांना वेअर हाउस, कोल्ड स्टोअरेज बांधण्यास परवानगी द्यावी, पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्यासह काही महत्त्वपूर्ण प्रश्न सोडविण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकारी पतसंस्थांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय देशाची संघटना असलेल्या युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने (युनो) सन २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ जगातील सर्वात मोठी चळवळ आहे. या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या स्वागतानिमित्त आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी सहकारी पतसंस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे.