
ऋषिकेश जाधव
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान कायमच प्रथम राहावे यासाठी राज्य सरकारला अर्थसंकल्पात बऱ्याच बाबींसाठी तरतूद करता येईल. वेगळ्या विशेष इलेक्ट्रॉनिक सिटी, इंडस्ट्रियल सिटी, आयटी सिटी यांची स्थापना, तसेच सोपी कररचना, छोट्या उद्योगांना सुलभ कर्जपुरवठा, महाविद्यालयीन स्तरापासून संशोधन आणि विकास यासाठी अर्थसाहाय्य, उद्योगांना प्रोत्साहनपर सवलती या बाबींवर अर्थसंकल्पात भर दिला पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत न्यायची आहे. आपण देशातील सर्वांत जास्त करभरणा करणारे राज्य असल्याने या उद्दिष्टात महाराष्ट्राचाही मोठा वाटा असेल. राज्यात अजूनही अनेक मोठे उद्योगसमूह येण्यास उत्सुक असल्याने त्यांच्या स्वागतासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.