संजीव भागवत
जगभरातील शिक्षण, ज्ञान-तंत्रज्ञानाच्या सर्वच क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) महत्त्व अधोरेखित झाले आहे. देशासह राज्यातील शिक्षणसंस्था, विद्यापीठांनाही गुणवत्ता आणि विकासासाठी ‘एआय’ महत्त्वाचे ठरत आहे. बहुसंख्य विद्यापीठे अन् शिक्षण संस्थांनी ‘एआय’ची कास धरल्याने शैक्षणिक विकासाचे नवनवीन प्रयोग समोर येताना दिसताहेत. याच धर्तीवर तंत्रशिक्षण विभागाचा कारभार अधिक पारदर्शक-लोकाभिमुख करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने ‘एआय’चा वापर केला अन् त्यांना यश मिळाले...
राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या यशाची दखल नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या कार्यालयीन मूल्यमापन सुधारणेच्या १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत घेण्यात आली. यात पहिल्या टप्प्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या शासकीय कार्यालयांसह सर्वोत्तम आयुक्त, संचालक, सर्वोत्तम जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यातील प्रत्येकी पाच अशा एकूण २० जणांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्यात तंत्रशिक्षण संचालक राज्यात पहिल्या क्रमांकाचे गुण मिळवत अव्वल ठरले. हा विभाग उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असल्याने याचे बरेचसे श्रेय त्यांनाही द्यायला हवे. त्यांच्या एका विभागाने केलेली ही कामगिरी येत्या काळात उच्च शिक्षण विभागालाही प्रेरणा देऊ शकते.