

Mahayuti vs Maha Vikas Aghadi
esakal
गेल्या सात वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये विश्वासार्हतेचा प्रश्न असणाऱ्या महायुतीने प्रतिमेवर कष्ट घेतले आणि विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. यापुढील काळामध्ये मित्रपक्षांबरोबरील समन्वय आणि प्रश्नांची सोडवणूक यांवर लक्ष केंद्रित करणारा हा कालखंड आहे. या काळातील सरकार आणि विरोधी पक्षांची कामगिरी यावरच २०२९च्या निवडणुकीचे यशापयश ठरणार आहे.
वळणावळणाच्या रस्त्यांचं एक वैशिष्ट्यं असतं. वळणावर असताना पुढचं वळण दिसत नसतं. पुढचं वळण स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नसताना गाडी वेगात हाकणं धोक्याचं असतं. शेजारच्या वाहनाला ओलांडण्यासाठी वळण ही अत्यंत चुकीची जागा. वळणांवर बेसावध प्रवास न करणं हा झाला प्रवासातील सुरक्षिततेचा सर्वसाधारण नियम. राजकारणालाही हाच नियम लागू पडतो. राजकारणाच्या रस्त्यांवरही वळणं येतात. पुढचं वळण स्वच्छ दिसत नसताना घेतलेले निर्णय राजकीय अपघाताचे कारण ठरतात. वळणावर घाईनं पुढं जाण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणाचा रस्ता वळणं घेत पुढं सरकत आहे. २०१९ ते २०२६ या काळात महाराष्ट्रानं सर्वाधिक राजकीय वळणं अनुभवली. २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या काळात नवी वळणं आली. या साऱ्या वळणांवर वेगानं धावू पाहणाऱ्यांचे आणि ओव्हरटेक करू पाहणाऱ्यांचे राजकीय अपघात झाल्याचं अगदी ठळक दिसतं. अगदी कालपरवा जिल्हा परिषद निवडणुकांचं राजकीय वळण महाराष्ट्रानं ओलांडलं. त्याआधी महापालिका निवडणुकांच्या वळणांवरून महाराष्ट्र पुढं आलेला होता. त्याच्याही आधी विधानसभेचं वळण महाराष्ट्रानं घेतलं आणि त्याहीआधी लोकसभा निवडणुकांचं वळण पार पाडलं होतं. पाच वर्षांपूर्वी काय घडलं, हे बाजूला ठेवू. अगदी आत्ता आत्ता म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून ते जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपर्यंतच्या वळणांवर काय घडलं आहे, हे पाहिलं तरी राजकारणाला वळणावळणाचे सर्वसाधारण नियम कसे लागू पडतात, हे साफ दिसतं आहे. पुढच्या वळणांचा काहीएक अंदाज त्यातूनच घेता येणार आहे.