
डिजिटल एडिटिंग हे अवघड काम होते. त्यातही चित्रपटाचं एडिटिंग ‘हेवी वर्क्स’वर करणं आव्हान होतं. त्याचबरोबर संगणकावर काम करताना स्पेशल इफेक्ट्ससाठी ‘फ्लेम्स’ हे आधुनिक सॉफ्टवेअर वापरलं. तंत्रज्ञानाच्या या लढाईत ‘हार्ड डिस्क’ क्रॅश होण्यासारखी कसोटीची वेळ आली. या सगळ्या प्रवासात अनंत अडचणी आल्या, पण त्यावर कशी मात केली, ते सांगत आहेत ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे...
माझ्या प्रत्येक चित्रपटांमध्ये मी नेहमी प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. मला नेहमीच नावीन्यपूर्ण गोष्टीची आवड राहिली आहे. त्यातच ‘व्हीएफएक्स’बद्दल मला भलतेच आकर्षण होतं. ‘धडाकेबाज’ चित्रपटापासून मला स्पेशल इफेक्ट्सचा ध्यास लागलेला होता. ‘धडाकेबाज’मध्ये मी विचार केला, की आपण ह्या चित्रपटात काहीतरी वेगळं करूयात. तेव्हा मी मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच सिनेमास्कोप चित्रपट केला होता. असा प्रयोग करणारा मी पहिलाच. ‘धडाकेबाज’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर मला व्हीएफएक्सचा ध्यासच लागला.
‘झपाटलेला’मध्ये मी मेकॅनिकल इफेक्ट्स केले होते. पण खरे व्हीएफएक्स मी ‘पछाडलेला’ या चित्रपटात केले. त्या चित्रपटातून पहिल्यांदाच डिजिटल स्पेशल इफेक्ट्सचा प्रयोग करण्यात आला होता. त्या आधी मी ‘धांगडधिंगा’ चित्रपट केला होता. त्यात मी प्रथमच डिजिटल एडिटिंग केलं होतं. त्या वेळी चित्रपट डिजिटल झाला नव्हता. पण बऱ्याच हिंदी चित्रपटांचं डिजिटल एडिटिंग होत होतं. तेव्हा चित्रपटाला बीटा टेपवर ट्रान्स्फर केलं जायचं.