
मा झा पहिला चित्रपट १९७५ मध्ये ‘प्रीत तुझी माझी’ मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत प्रदर्शित झाला. मी खूप उत्साही होतो. वाटलं होतं, की आता माझ्या करिअरला एक वेगळे वळण मिळेल, निर्माते माझ्यासोबत काम करण्यासाठी रांगा लावतील. पण अपेक्षांच्या अगदी विरुद्ध घडलं. हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट त्याच सोमवारी थिएटरमधून उतरवण्यात आला. त्या वेळी मी लॉ कॉलेजमध्ये वकिलीचं शिक्षण घेत होतो. त्या काळी एक प्रसिद्ध चित्रपट समीक्षक होते. ते सिनेमाचे रिव्ह्यू लिहायचे आणि त्यांचं मत प्रेक्षकांसाठी निर्णायक ठरायचं. तेव्हा शुक्रवारीच चित्रपटांचे रिव्ह्यू यायचे.
कारण त्यांना चित्रपट एक दिवस अगोदर दाखवले जायचे. माझ्या चित्रपटाचा त्यांचा रिव्ह्यू प्रकाशित झाला. माझ्या कॉलेजमध्ये एक मित्र होता. त्याचं नाव होतं प्रसाद रावते. सकाळी सकाळी प्रसाद रावतेचा मला फोन आला, ‘‘अरे महेश, तुझ्या सिनेमाचा रिव्ह्यू वाचलास का?’’ मी उत्सुकतेने विचारलं, ‘‘काय काय लिहिलंय सांग, मला सुद्धा ऐकायचंय?’’ तर त्याने त्याची हेडलाइन वाचून दाखवली. हेडलाइन होती, ‘तोंडावरची माशी न हलवणारा हीरो.’ त्यात पुढे असंही लिहिलं होतं, की ‘‘गाण्यांत ह्याची तर साफ विकेटच गेली आहे.’’ एवढा वाईट रिव्ह्यू त्यांनी लिहिला होता की त्यानंतर साहजिकच चित्रपट साफ आपटला. कॉलेजमध्ये जायचो तेव्हा मुलं मागून बाण फेकायचे, हसायचे, ‘फ्लॉप हीरो’ म्हणून हिणवायचे. मी खूप दुःखी व्हायचो. स्वप्न होतं हीरो होण्याचं, पण वाटलं आता आपण तर झीरो झालो.