
आमीर खानचा सल्ला मी मानला नाही आणि माझ्या नियोजनानुसार मी चित्रपटनिर्मिती केली, पण त्यात मला मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर दूरचित्रवाणीवरच्या मालिकांनी मला यशाचा रस्ता दाखविला, सुरुवातीला या माध्यमाची मला फारशी कल्पना नव्हती. पण नंतर मला त्याचे गणित समजलं. त्याआधी साईबाबांवरील एका लघुपटानं माझी गाडी रुळावर येण्यास सुरुवात झाली...
‘माझा छकुला’ या चित्रपटानंतर मी ‘मासूम’ हा चित्रपट केला. तो प्रचंड सुपरहिट ठरला. या चित्रपटाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे ह्यात आयेशा जुल्काचा कमबॅक होता. ती बराच काळ इंडस्ट्रीपासून दूर होती, पण ‘मासूम’मधून तिचं पुनरागमन झालं. या चित्रपटात तिच्यासोबत एक नवोदित कलाकार होता- इंद्र कुमार. त्याला मी पहिला ब्रेक दिला. चित्रपटाला संगीत दिलं होतं आनंदराज आनंद यांनी. आनंद हा एक संघर्ष करणारा संगीतकार होता. त्याला मी ‘मासूम’मध्ये संगीतकार म्हणून संधी दिली. या चित्रपटात एक लहान मुलगा ‘आदिनाथ’च्या भूमिकेसाठी हवा होता. सुरुवातीला मी आदिनाथला घ्यायचं ठरवलं होतं, पण त्याच्या शाळेची शिस्त खूप कठोर होती. हा हिंदी चित्रपट असल्याने त्याचं शूटिंग वर्षभर चालणार होतं, त्यामुळे त्याला शाळा बुडवून काम करणं शक्य नव्हतं. म्हणून शेवटी आम्ही ओंकार कपूर नावाच्या एका नवीन मुलाला ब्रेक द्यायचं ठरवलं. ‘मासूम’च्या कास्टिंगमध्ये ओमकार कपूर, आयेशा जुल्का, इंद्र कुमार, टिनू आनंद, सुलभा आर्य, रेणुका शहाणे, सुरेश ओबेरॉय आणि लक्ष्या हे सगळे होते. ही एक मजबूत स्टारकास्ट होती. लक्ष्मीकांत बेर्डेशिवाय मी माझी एकही कलाकृती सादर केली नाही. म्हणूनच लक्ष्या एका महत्त्वाच्या भूमिकेत होता.