
भूषण महाजन
निर्देशांक वरही जाणार नाहीत किंवा फार खालीही जाणार नाहीत. एकाच टप्प्यात खाली-वर होत राहतील असे समजायला हरकत नाही. परंतु आता जोखीम वाढत चालली आहे. तेजी करताना शेअरची निवड अत्यंत काळजीपूर्वक करायला हवी. तेजी करायची नसेल, तर ज्याठिकाणी भरपूर नफा आहे तो वसूल करावा आणि स्वस्थ बसावे. नवी खरेदी जपूनच!
एकेकाळी सुपरहिट झालेल्या चक दे इंडिया चित्रपटातील शेवटचा प्रसंग आठवा. हॉकी वर्ल्डकप, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल सुरू आहे, आणि पेनल्टी शूटआउटमध्ये सामन्याचा निकाल लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा शेवटचा प्रयत्न. शेवटची स्ट्रायकर पेनल्टी स्ट्रोक मारण्यासाठी तयार. कोच कबीर बघतोय, आता ही स्ट्रोक डावीकडे मारणार असे वाटते कारण तिची हॉकी स्टिक डावीकडे आहे, पण तिचा पाय तर उजवीकडे आहे, म्हणजे उजव्या बाजूला मारेल का? काय सांगावे? साराच गोंधळ! आणि एकदमच कबीर खानला साक्षात्कार होतो, की ती सरळ स्ट्रोक मारणार आहे.