
मुंबईतील बिगर-मराठी रंगभूमीला वैभवशाली इतिहास आहे. आज ती परंपरा मकरंद देशपांडे चालवत आहे. असं मोठं काम करणारी मंडळी जशी अनेकदा अवलिया असतात तसाच मकरंदही आहे. त्याच्या नाट्यसंस्थेचा ‘अंश नाट्यलीला २०२५’ नाट्यमहोत्सव पृथ्वी थिएटरमध्ये होत आहे...
मुंबईतील रंगभूमी नेहमीच बहुभाषिक होती. मुंबई शहर कॉस्मोपॉलिटन असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर असल्यामुळे तिच्या संस्कृतीवर बहुभाषिकतेचा प्रभाव स्पष्ट दिसतो. त्याला मुंबईतील रंगभूमी अपवाद नाही. मुंबईतील एकूण रंगभूमीला जसं आधुनिक मराठी रंगभूमीचं ठसठशीत योगदान आहे, तसंच इंग्रजी व हिंदी रंगभूमीचंसुद्धा लक्षणीय योगदान आहे. याच शहरात इब्राहिम अल्काझी यांनी १९५० ते १९६२च्या दरम्यान ‘थिएटर युनिट’ ही बिगर-मराठी नाटकं सादर करणारी नाट्यसंस्था चालवली व नाट्यचळवळीला योग्य दिशा दिली. आजही मुंबईत जुहूचं ‘पृथ्वी थिएटर’ व नरिमन पॉइंटचं ‘एनसीपीए’ ही नाट्यगृहं महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. मुंबई शहरातील बिगर-मराठी रंगभूमीला वैभवशाली इतिहास आहे.