
श्यामल रॉय
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जींंचे नाव उत्तराधिकारी म्हणून पुढे केले आहे. अभिषेक यांच्या धोरणांवरून पक्षात जुना-नवा संघर्ष असला तरी अंतिम शब्द माझाच, असे ममता यांनी स्पष्ट केल्याने वरवर तरी शांतता आहे.
ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा अभिषेक यांच्यात एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू आहे. अनेक मुद्द्यांवरून दोघांमध्ये मतभेद असल्याने खरेतर या शीतयुद्धाला तोंड फुटले आहे. त्यामुळे पक्षात काहीशी अस्वस्थता पसरली आहे. बदलांना सामोरे जातानाच जुने कार्यकर्ते, नेते तुटू नयेत यासाठी सर्वांना दिलासा देण्याचे आणि ‘पक्षात माझाच शब्द अंतिम आहे’, असे जाहीरपणे ममता सांगणे भाग पडले आहे.
यापूर्वी अनेकदा पक्षाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आले. त्या प्रत्येक वेळी ममता बॅनर्जी यांनी स्वतःला पक्षाचा एकमेव चेहरा अशा स्वरूपात लोकांसमोर उभे केले होते आणि त्या प्रत्येक वेळी त्यांना यश मिळाले होते. भाजप आणि मोदी यांचा विजयरथ थोपविण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम त्यांनी स्वतःची ‘बांगलार मेये’ (बंगालची मुलगी) अशी प्रतिमा जनतेसमोर मांडली. यात त्यांना यश आले.