

Manachitra Art Exhibition
esakal
महेंद्र सुके - mahendra.suke@esakal.com
शहर म्हणजे केवळ इमारती, रस्ते, चौक, पूल आणि माणसांची गर्दी नव्हे. शहराचंही एक मन असतं. त्याला स्वत:च्या आठवणी असतात, लय असते, गती असते, अस्वस्थता असते आणि कधी कधी एकाकीपणही असते. एखादं शहर आपण नकाशावर पाहतो तेव्हा त्याच्या सीमा दिसतात; पण एखादा कलाकार तेच शहर त्याच्या अंतर्मनातून पाहतो, तेव्हा त्या सीमांच्या पलीकडे एक वेगळंच विश्व उलगडतं. ज्येष्ठ चित्रकार पौर्णिमा दयाल यांच्या ‘मानचित्र’ या कलाकृतींतूनही उलगडणारं हे विश्व अशाच अंतर्मुख करणाऱ्या नागरी अनुभवाचा अमूर्त शैलीतील कलाविष्कार आहे.
मुंबईतील जहांगीर कलादालनात ‘मानचित्र’ हे प्रदर्शन सुरू आहे. २४ ऑगस्टपर्यंत चित्ररसिकांना त्याचा आनंद घेता येणार आहे. कॅनव्हास आणि कागदावर साकारलेल्या या कलाकृतींमध्ये शहरदृश्यं आहेत; मात्र त्या कोणत्याही शहरांच्या वास्तवदर्शी प्रतिकृती नाहीत. त्या कलासाधनेच्या कल्पक स्मृतीतून आणि त्या त्या क्षणाच्या मन:स्थितीतून जन्माला आलेल्या आहेत.