
डॉ. श्रीमंत कोकाटे
shrimantkokate1@gmail.com
आपण लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, अशी प्रेरणा हतबल झालेल्या भारतीयांच्या मनात जिजाऊ-शिवरायांनी निर्माण केली. त्यामुळे शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट होऊन रयतेचे स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि छत्रपती ताराराणी यांनी अत्यंत हिमतीने केले. छत्रपती संभाजीराजांनी मरण पत्करले; पण ते मोगलांना शरण गेले नाहीत. महाराणी ताराराणीने औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले.
छत्रपती संभाजीपुत्र शाहू महाराजांनी शिवरायांनी निर्माण केलेल्या व संभाजीराजे, राजाराम आणि ताराराणी यांनी रक्षण केलेल्या स्वराज्याचा अटकेपासून त्रिचिरापलीपर्यंत आणि कराचीपासून ढाक्यापर्यंत (बंगाल) विस्तार केला. त्यासाठी उमाबाई दाभाडे, दमाजी गायकवाड, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, फत्तेसिंग भोसले, रघोजी भोसले आदी शूरवीरांनी मोठा पराक्रम गाजविला. शाहू महाराजांना सुमारे ६७ वर्षांचे आयुष्य लाभले. ते साधारण १८ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी सुमारे ४२ वर्षे राज्य केले.