
मुंबईच्या मयनगरीत भव्य चित्रपटांची स्वप्नं साकारली जात होती. मेहबूब खान यांचा भव्य ‘आन’ सातासमुद्रापार गाजत होता. राज कपूरचा सिनेमा रशिया, पूर्व युरोपात गाजत होता. ‘आवारा’ची गाणी उझबेकिस्तानमधली मुले गात होती. अशा वेळी मराठी चित्रपट एक वेगळी लढाई लढत होता.
खरे तर प्रतिसृष्टी निर्माण करणारे कला दिग्दर्शक कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी मूकपटातून, नंतर त्यांचे शिष्य साहेबमामा फत्तेलाल यांनी ‘प्रभात’मधून अद्भुत देखाव्यांचे कलात्मक सेट उभे केले होते. वास्तवदर्शी ‘माणूस’मध्ये वेश्यावस्तीचा सेट पाहायला मेहबूब खान स्वतः पुण्यात येऊन गेले होते. ‘मुघल-ए-आझम’चे स्वप्न मनात घोळवत असलेल्या के. असिफने ‘रामशास्त्री’ अगणित वेळा पाहिला होता. ‘संत ज्ञानेश्वर’, ‘संत तुकाराम’ व्हेनिसच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून गाजले होते; पण हा काहीसा इतिहास झाला होता. काळाची रिळं भराभर पुढे चालली होती. तशातच भालजी पेंढारकर यांच्या ‘जयप्रभा’वर महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर घाव पडला होता. ‘प्रभात’ही बंद झाले होते; पण मराठी माणसं मराठी सिनेमासाठी पुन्हा एकत्र येत होती.
५०च्या सुमारास दि. आ. पाटील आणि दिनकर द. पाटील यांनी ‘उदयकला’ या आपल्या संस्थेसाठी कोल्हापुरात दोन चित्रपटांची जुळवाजुळव सुरू केली. ‘राम राम पाव्हणं’ आणि ‘पाटलाचा पोर’. दोन्हीचं कथा- दिग्दर्शन- पटकथा- संवाद हे दिनकर द. पाटील यांचे. ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटाचं संगीत दिलं होतं लता मंगेशकर यांनी! आणि पहिल्यांदाच चित्रपटाची गाणी लिहिली होती शांता शेळके यांनी! व्यावसायिक पातळीवर गीतलेखन करणाऱ्या पहिल्या स्त्री गीतकार म्हणून शांताबाईंचे नाव घ्यावे लागेल.