

A Journey Through Childhood
esakal
एवढं बोलून आई कुठेतरी हरवली,
जुन्या दिवसांत, जुन्या आठवणीत हरपली,
कुठे तरी दूर ऽऽऽ दूर ऽऽ गेली.
आई इथेच होती, माझ्या जवळच बसली होती,
पण मनाने ती अतीतात गेली होती.
जुन्या दिवसांत, सुख-दुःखात हरपली होती.
आठवणींच्या पाऊस ऋतूत भिजायला गेली
होती. ती आठवणींच्या पावसात भिजत होती.
पण इथे मात्र पाऊस नव्हता. फक्त - आवाज
होता, पाऊस पडण्याचा आवाज कानी पडत होता,
पाऊस पडण्याचा निनाद, निनादत होता.
आणि ते पावसाळी भिजलेले मेघ,
आणि त्या भिजलेल्या मेघात,ओली झालेली
ती सूर्यकिरणे एकमेकांत मिसळली होती.
एकमेकांत अडकली होती.
एकमेकांत विसर्जित झाली होती.
एकमेकांत एकाकार झाली होती.
तो पावसाळी भिजलेला मेघ म्हणजे
प्रियकर काय? पुरुष काय?
ती भिजलेली ओली सूर्यकिरणे म्हणजे
प्रेयसी काय? स्त्री काय?
या दोघांचं प्रेम, एकमेकांत विसर्जित होणे,
एकाकार होणे, मिसळून एकरंग होणे,
समाजपुरुषाला मान्य नाही का ?
तो दोघांना एकमेकांपासून सोडवण्याचा
का प्रयत्न करतोय ?
ती निराधार, एकाकी होती.
पण माझी आई होती
आकाश, मेघ, काय रडतील ! इतका रडलो मी.
माझी परिस्थिती, अवस्था बघून वारा पण
सावध झाला. काहीतरी अघटित घडलेय, याची
जाणीव वाऱ्याला सुद्धा झाली.
पाऊस पडत होता, पण कुठेतरी दूर ऽऽ दूर
पण आवाज कानी पडत होता. इथे पाऊस
नव्हता. धूळ आणि शुष्क पाचोळा होता.
ती धूळ, तो शुष्क पाचोळा उडून याच्या
रडून आरक्त झालेल्या डोळ्यात, जाऊन
याचे डोळे अधिक रक्ताळू नयेत,
म्हणून वारा, धूळ, पाचोळा सावकाश
सावधपणे उडवत होता.
भविष्याची चाहूल लागल्यामुळे वारिया पण
सावरला आणि मी पण सावध झालो.
ज्या अंगणात आईने मला अंगाखांद्यावर
खेळविले होते. दुःखात, सुखात मला
पोटाशी धरले होते. ज्या अंगणात मी खेळायचा,
झाडांना पाणी घालायचा,
उन्हाळ्यात रात्री अंगणात पथारी टाकून
झोपायचा, भविष्याची स्वप्ने रंगवायचा,
ज्या अंगणात मी आईकडे हट्ट धरायचा
आणि आई तो प्रेमाने पुरवायची,
त्या माझ्या आवडीच्या अंगणात,
अचानक माझे बालपण संपले. एका क्षणात
मी प्रौढ झालो. बालपणाचा आनंद संपला,
बालपणाची ती निरागसता सरून
अचानक प्रौढत्वाची निबरता त्यात आली.
"प्रौढत्वी निज शैशवास जपणे"
त्या ऐवजी, बालपणातच शैशवास जपणे
नशिबी आले.
संपले बालपण माझे.
माझ्या जन्माचा, बालपणाचा, एकमेव
साक्षीदार अनेक वर्षांपासून खिडकीवर टांगलेल्या
अवस्थेत, जळून धुरकट झालेला जुनाट कंदील,
एकाकीपणे माझ्याकडे
पाहत होता. तो कंदील नव्हताच,
ती जळणारी फक्त वात होती. त्रिशंकूसारखी,
परिस्थिताला, जीवनाला टांगली गेलेली,
तारुण्य सरलेली माझी आई होती ती,
ती जळणारी वात, ती जळणारी ज्योत माझी आई
होती. धुरकट का असेना, एकाकी का असेना,
पण घराला प्रकाश देत जळत होती ती.
माजघरातला दिवा,
थरथरता का असेना, प्रकाश देतो घरा,
शम्मा हर रंग मे जलती है,
सहेर होने तक
राजमहालात ‘दीपशिखाचे’ सौंदर्य लेवून,
झोपडीत धुरकट ‘वातीचे’ रूप घेऊन,
मंदिरात समईची ‘ज्योत’ बनून.
वेश्यागृहात शम्मादानात ‘शम्मा’ सजून,
प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक प्रसंगात,
ज्योतीला सकाळ होईस्तोपर्यंत
प्रकाश देत देत जळावेच लागते,
हे रक्त वाढतानाही
मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदीच्या ही
तो कृष्ण नागडा होता
अंगणात अकस्मात रम्य बालपण सरलं,
आणि अंगात तरुण रक्त सळसळू लागलं,
पण मला त्याचं फारसं कौतुक नाही,
आणि बालपण संपल्याचा गहिवरही नाही.
कारण वस्त्रात द्रौपदीच्याही
तो कृष्ण नागडा होता.
पुरुष स्त्रीचा अपमान करू शकतात,
छळू शकतात, अब्रू घेऊ शकतात.
पण स्त्रीची अस्मिता, पवित्रता,
माया, प्रेम, करुणा कधीच हिरावू शकत नाहीत,
द्रौपदीचं वस्त्रहरण झालंच नाही.
ज्यांनी वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला,
त्यांचंच वस्त्रहरण मात्र झालं,
द्रौपदीची अब्रू वाचविण्यासाठी श्रीकृष्ण
उशिरा पोहोचले, द्रौपदीच्या वस्त्रहरण
केलेल्या वस्त्रात श्रीकृष्णच नग्न झाले.
‘‘काय झालं दीना! तू अचानक गप्प का
झालास? तुला रडताना मी आज पहिल्यांदा
पाहिलं, कितीही त्रास झाला तरी तू रडत
नाहीस आणि रडता रडता अचानक गप्पही
झालास, कुठल्या विचारात अडकला आहेस
तू ?" आई काकुळतीला येऊन म्हणाली.
मी व्याकूळ झालो, भरल्या गळ्याने म्हणालो
‘‘मला न बघता, मला न कुरवाळता बाबा
मला सोडून गेले? का, मी असा काय गुन्हा
केला होता? आई का सोडून गेले ते
आपल्याला?"
‘‘नशीब आपलं,’’ आई उदास होऊन म्हणाली.
मी अगदी शांतपणे, पण विचारपूर्वक
निर्धारपूर्वक, विषय संपवत म्हणालो.
‘‘आई ! तुझं दुःख मला आज कळलं,
तुझी वेदना आज समजली, तुझा त्रागा आज
कळला. माझा जन्म झाला आणि माझ्याकडे
न बघता माझे वडील तुला आणि
मला सोडून गेले. मी अनाथ झालो.
तू निराधार झालीस, पण आपल्याला
का सोडून गेले ते?"
खबरदार दीना ! या बाबतीत तू आता एक
शब्दही बोलायचा नाही.
‘‘दीना ! मी आज चुकून बोलून गेले.
पण तू यात पडायचं नाही. विचार करायचा
नाही. फक्त संगीत साधना करायची.
बाकी मी सांभाळून घेईन... आणि ऐक
यांच्याबद्दल विचार करायचा नाही.
आणि परत या विषयावर कधी बोलायचे सुद्धा
नाही, ही माझी विनंती नाही,
ही माझी आज्ञा आहे, समजलास."
‘‘ताई ! किती राग राग, त्रागा करून घेतेस
तू. आधी जी गोष्ट आयुष्यात दीनापुढे
बोलायची नाही. ती गोष्ट, ते दीनाचे
जन्मरहस्य रागात तू दीनापुढे बोलून गेलीस
आणि आता परत त्याच्यावरच राग काढतेस !
जरा विचार कर दीना कालपासून
उपाशी आहे. त्याला आधी दोन घास
जेवायला घाल. मग तुझ्या आज्ञा,
आदेश, हुकूम काढ."
मला जवळ ओढत, येशूमावशी एकदम कडाडली.
आई एकदम स्तब्ध झाली. घाईघाईने
म्हणाली.
‘‘येशू ! माझं मेलीचं वय झालंय, सगळंच
विसरते. आज दीनासाठी मी उत्तम जेवण
केले आहे. तो उपाशी आहे, याचाच विसर
पडला बघ, दीना ! तू हातपाय धुवून घे
ए नगू ! चल लवकर जेवण गरम कर आणि
वाढायला घे."
आणि आई, सखवा, नगूबाई घाईघाईने
कामाला लागल्या. नगूबाईने माझे ताट
वाढले. मी हातपाय धुवून जेवायला बसलो,
आणि अनेक तास मेलेली माझी भूक एकदम
उसळून वर आली. अन्नाची मी आतुरतेने वाट बघू
लागलो, मावशी माझ्या शेजारी बसली आणि
नगूबाईने ताटात पोळी, दोन भाज्या, काळा भात,
कोशिंबीर वाढली. मी आश्चर्याने म्हणालो.
"आई ! किती स्वयंपाक केलास तू !
हा काळा भात, भाज्या, ही पोळी, कोशिंबीर
एवढं एकटीनं केलं? का केलंस आई?"
आई आनंदाने म्हणाली.
"अरे ! गोड खीर आणि लाडू सुद्धा आहेत.
काय झालं दीना ! आज मंदिरात नवस
फेडायला पुण्याचे प्रसिद्ध व्यापारी
देवल आले होते. त्यांना मुलगा झाला,
म्हणून नवस फेडायला त्यांनी देवळातल्या
साऱ्यांना जेवण दिले. अरे ! सारा शिधा
त्यांनी पुण्याहून आणला होता, चार स्वैंपाकी
सुद्धा आणले होते, ताट वाट्या आणले होते,
फार श्रीमंत आहेत ते. त्यांना काय कमी?
हात सोडून खर्च केला होता आणि इतके
नम्र की साऱ्यांना स्वःतहा आग्रह करत होते,
मी, तुझी मावशी, नगू, या साऱ्या सखवा,
आम्ही पोटभर जेवलो. नगू तर खूशच होती
होय ना नगू! "
मी घास घ्यायला पुढे केलेला हात मागे
घेतला, संकोचून म्हणालो
‘‘म्हणजे, भक्त, मंदिरातले कर्मचारी, पुजारी
सारे जेवले? पण मध्यरात्री हे जेवण
आपल्या घरी कुणी आणले? ’’
‘‘मी आणले, इतके चांगले जेवण मी एकटीच
कशी जेवणार? साऱ्यांचे जेवण संपल्यावर मी
त्यांच्याकडून तुझ्यासाठी हे जेवण मागून आणले. ’’
आई उत्साहाने म्हणाली.
‘‘म्हणजे आई, तू माझ्यासाठी, त्यांच्याकडे जेवण
मागितलेस?’’ मी आश्चर्याने म्हणालो.
‘‘ हो मागितले, त्यात काय झाले?
सारी मंगेशी जेवली, मी काही एकटी जेवले
नाही. ’’ आई अडखळत म्हणाली.
‘‘ होय दीना ! सारी मंगेशी जेवली, मी सुद्धा
पोटभर खाल्लं. पण जेवण मागून मात्र घरी
आणलं नाही, थोंग्यात्या ! तू जेवण मागून
चांगलं नाही केलंस ! ’’ एक सखवा तोऱ्यात
म्हणाली.
आई एकदम कडाडली.
‘‘ ए केसर ! कोणाशी बोलते आहेस तू?
पन्नास लोकांचं जेवण पडलं होतं. एका
मुलाचं जेवण मागितलं, तर असा काय मोठा
अपराध केला मी? ’’
‘‘ हे बघ थोंग्यात्या ! आम्ही साऱ्या जणी
आनंदाने भरपूर जेवलो, गाव जेवलं. पण
कुणीही अन्न मागून घरी आणलं नाही. ’’
केसर गालात गालात हसत पुटपुटली.
आणि आई किंचाळली
‘‘ केसर ! तुला काय म्हणायचे आहे ते माझ्या
लक्षात आले आहे, मी त्या पुणेकरांकडे भीक
मागितली आणि हे अन्न
घरी आणलं. मला भिकारी म्हणायचं आहे
ना तुला ! हो आहे मी भिकारी,
माझ्या दीनासाठी मी भिकपण मागेन.
आणि हसता काय फिदी फिदी, चला उठा,
चालत्या व्हा इथून. ’’
साऱ्या सखवा तोंडातल्या तोंडात हसत
निघून गेल्या, या तुर्रेबाज थोंगाची कशी
जिरविली याच आनंदात त्या होत्या.
मी सुन्नपणे ताटावर बसलो होतो.
भूक मेली होती, मन अस्वस्थ झालं होतं,
खाली मान घालून मी म्हणालो,
‘‘आई ! क्षमा कर, पण हे मागून आणलेले,
दान केलेले अन्न मी खाणार नाही.
दीनानाथ अन्नछत्रातले अन्न खात नाही,
पाणपोईचे पाणी पीत नाही.
भुकेने शरीर मरते,
भिक्षेने मन मरते.’’
(क्रमशः)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.