

Marathi Rural Humour
esakal
किशोर बळी - sakal.avtaran@gmail.com
तसं पाह्यलं तं माह्यं नाव श्रीकांत. आमच्या गावात त्याचा ओरिजनल उच्चार ‘शिर्कांत’ असा होते. मालं नाव सरकं कोनालेच ना घेता ये. माह्या बुढ्याले म्हनजेच बापाले ऊर्फ पोप्पालेच तं ते ज्यमे नाई, तं कोनाचं काय सांगू? पोट्टे मले शिऱ्या म्हनत. माल्या मम्मीले ते खराब वाटे; पन् पोप्पा मले लाळानं... खरं म्हनजे नाइलाजानं ‘पिंट्या’ म्हनत असल्याच्यानं पुढे मी पिंट्या म्हनूनच वयखल्या जाऊ लागलो.
पुऱ्या गावात मले ‘शिर्कांत’ म्हननारं एकच कॕरेक्टर होतं, ते म्हनजे माह्या मामाची पोरगी प्रगती. माह्यं नाव पिंट्या पळल्याच्यानं तिले सर्वेजनं ‘पिंकी’ म्हनून चिळवत. तिनं मले ‘शिर्कांत’ म्हतलं की मले भल्लं गमे. माही माय त्या काळातली मॕट्रिक. तिले वाटलं की आपल्या पोराचं काही ना काही स्टँडर नाव ठेवाव. आता सांगा काही गरज होती काय असा फालतूचाच मोठेपना कराची? तो ‘श्री’ शिक्यासाठी मले दोन वर्स लागले ना!! अन् पाचवीचं प्रथम सत्र स्पेलिंग पाठ कऱ्यात गेलतं. बरं, जाऊ गेलं तं!! तं सांग्याचा मतलब असा, की जो तो मले ‘पिंट्या’च म्हने. त्यावक्ती ते साजरंई वाटे; पन् मी तेवीस वर्षांचा झालतो तरी मले पिंट्याच म्हनत. मी म्हनो, ‘अरे बापा, आता लग्नाले आलो ना मी!! आता तं मले शिर्कांत म्हना.’ पन् नाई!! म्या तं पक्कं डिसीजन घेतलं होतं, की भविष्यात ज्यावक्ती मी बाप होईन, तं माल्या लेकराले असं कोन्तंच टोपननाव ठेवनार नाई. नाई तं ते कान्व्हेंटमध्ये जाऊन म्हनीन - ‘माय नेम इज गोल्या अन् माय फादर नेम इज पिंट्या!!’