
आशिष गर्दे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (एमईडीसी)
दावोस परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचे अनेक करार होत असताना, मराठवाड्यातील प्रकल्पांविषयीही सकारात्मक चर्चा झाली. मराठवाड्यात ईव्ही क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे पर्यावरणपूरक आणि हरित विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे मराठवाड्यासाठी केवळ औद्योगिक विकासाचं एक नवीन पर्व ठरू शकते.
दावोस येथे होणारी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ची परिषद भारतीय राज्यांना जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे. महाराष्ट्राने या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला असून, मराठवाड्यासारख्या भागासाठीही नवीन संधी उपलब्ध केल्या आहेत. मुंबई-नागपूर जोडणारा समृद्धी महामार्ग, छत्रपती संभाजीनगर-पुणे प्रस्तावित एक्स्प्रेस वे, ‘ऑरिक’सारखी एक अद्ययावत औद्योगिक वसाहत यामुळे देशाच्या विकासाचे भविष्यातील इंजिन म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरसारखे शहर जागतिक ईव्ही उद्योगाचे केंद्र बनत असल्यामुळे या गुंतवणुकीमुळे संपूर्ण प्रदेशाचा औद्योगिक विकास वेगाने होईल, असे दिसते.