esakal | हिटलरसाठी विषाची परीक्षा घेणारी 'मार्गोट व्होएक'
sakal

बोलून बातमी शोधा

Maragot Woelk}

हिटलरसाठी विषाची परीक्षा घेणारी 'मार्गोट व्होएक'

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

कल्पना करा, की तुमच्या समोरील मोठाल्या डायनिंग टेबलावर स्वादिष्ट पंचपक्वान्न ठेवले आहे. तुम्हालाही कडकडून भूक लागली आहे. पंचपक्वान्नाच्या घमघमाटानेच तुमच्या तोंडाला पाणी सुटले आहे व कधी एकदा त्याच्यावर ताव मारू, असं तुम्हाला वाटत आहे. मात्र तुम्हाला सांगण्यात आलं, की त्या पंचपक्वान्नात विष कालवलेले असू शकेल! तर तुम्ही ते पंचपक्वान्न खाल का? नाही ना! त्यापेक्षा चटणी-भाकर खाऊन जीव वाचवणे बरे किंवा उपाशी राहिलेले बरे, असेच तुम्हाला वाटेल ना! मात्र समोर पंचपक्वान्नाचे जेवण रचून ठेवलेले आहे व त्या टेबलाभोवती बऱ्याच स्त्रिया बसल्या आहेत. त्यांनाही खूप भूक लागली आहे. पण ते अन्न खाल्ल्याने त्यांचा जीव जाऊ शकतो; कारण त्यात एखाद्या वेळेस विष कालवलेले असेल, हे माहीत असूनही त्या महिला ते अन्न ग्रहण करतात. 1942 चा तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता, जेव्हा जर्मन हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलरचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता पंधरा महिला त्याच्या अन्नाची विषपरीक्षा घेत होत्या.

दुसऱ्या महायुद्धावेळी हिटलरला ठार मारण्यासाठी कोणीही शत्रू त्याच्या अन्नात विष कालवू शकतो, अशी भीती होती. हिटलरच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पंधरा महिलांची नेमणूक करण्यात आली होती. या 15 महिलांचे काम होते की त्यांनी प्रथम ऍडॉल्फ हिटलरसाठी बनवलेल्या अन्नाची चव घ्यावी, जेणेकरून त्यात विष आहे की नाही हे शोधता येईल. आश्‍चर्य म्हणजे डिसेंबर 2012 पूर्वी कोणालाही याबद्दल माहिती नव्हती. मात्र हे रहस्य उघडकीस आले. मार्गोट व्होएक नावाच्या सत्तरवर्षीय महिलेने ही गोष्ट सांगितली असून, तिने याबाबत आधी मौन पाळले होते. तिने मौन तोडण्याचा निर्णय घेतला आणि सांगितलं, की ती हिटलरच्या टीममध्ये होती, जी फूड टेस्टिंग करत असे.

इटालियन लेखिका रोजेला पॉस्टोरिनोने रोमच्या वृत्तपत्रात मार्गोट व्होएकबद्दल वाचले, तेव्हा तिला नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली. मग काय, तिने ज्या स्त्रिया हिटलरसाठी शिजवलेल्या अन्नाची चव चाखायच्या, त्यांचा शोध सुरू केला. या शोधाचा परिणाम म्हणजे "ला कैटादोरा' नावाचे पुस्तक, जे मार्गोट व्होएकपासून सुरू होते.

हिटलरसाठी काम करणाऱ्या या महिलांवर पुस्तक का लिहिण्यात आले?

पुस्तक लिहिण्याचे कारण सांगताना लेखिका रोजेला पॉस्टोरिनो म्हणते, एक दिवस मी इटालियन वर्तमानपत्रातील मार्गोट व्होएकबद्दल एक लेख वाचला. मार्गोट बर्लिनमध्ये राहणारी 96 वर्षीय महिला होती, जिने प्रथम स्वतःला हिटलरची फूड टेस्टर असल्याचे उघड केले. हे आश्‍चर्यकारक होते, की कोणालाही याबद्दल काहीही माहीत नव्हते. मी स्वत: पोलंडमधील वुल्फशांजला गेले होते, ज्याला दुसऱ्या महायुद्धात ऍडॉल्फ हिटलरची सर्वांत मोठी सैन्य बरॅक वुल्फ डेन म्हणूनही ओळखले जाते. तिथे मी बऱ्याच लोकांना विचारलं, की त्यांना हिटलरच्या फूड टेस्टरबद्दल काही माहीत आहे का? परंतु कोणीही याबद्दल ऐकले नाही.

अन्‌ मग तपास सुरू केला...

रोजेला पॉस्टोरिनो म्हणते, मला खरोखर कळत नव्हतं की मी काय करत आहे.. पण मला वाटलं, की काहीतरी मला ओढत आहे, खेचत आहे. मला मार्गोट व्होएकला भेटण्याची इच्छा होती, म्हणून मी तिची मुलाखत घेणाऱ्या मीडिया हाउसची मदत घेतली. पण, तेथून काहीच उत्तर आले नाही. पण, जर्मनीमधील एका मित्राच्या माध्यमातून मला मार्गोटच्या घराचा पत्ता मिळाला आणि तिला भेटण्यासाठी तिला पत्र लिहिले, पण त्याच आठवड्यात तिचे निधन झाले. त्यानंतर मी निराश झाले. मला वाटले, की मार्गोटच्या मृत्यूनंतर मी ही मोहीम सोडली पाहिजे. पण, माझ्या डोक्‍यातून ही गोष्ट बाहेर पडू शकत नव्हती, की एक विरोधाभासी कथा जी सर्व मानवतेचा विरोधाभास व्यापून टाकते, ती मांडणे गरजेचे आहे.

मार्गोट व्होएक एक विरोधाभासी पात्र आहे का?

मार्गोट व्होएक ही महिला नाझी असूनही तिला हिटलरसाठी फूड टेस्टर होण्यासाठी सक्ती केली गेली होती. मार्गोट व्होएकचा हिटलरवर विश्वास नव्हता, त्याला वाचवायचं नव्हतं. परंतु, तिला असे करण्यास भाग पाडले गेले आणि तिचा जीव धोक्‍यात आला. तिला दिवसातून तीन वेळा अन्नाची परीक्षा करताना मरणाला सामोरे जावा लागत होते. पण, त्याच वेळी ती जीव वाचवून एक प्रकारे हिटलरला साथ देत होती. विसाव्या शतकातील सर्वांत मोठ्या गुन्हेगाराला वाचवून ती या यंत्रणेचा भाग होत होती. या विरोधाभासामुळेच मला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे लेखिका रोजेला पॉस्टोरिनो म्हणते.

मार्गोट व्होएकच्या अनुभवाविषयी सार्वजनिक काय आहे?

मार्गोट व्होएकची कहाणी ही एक विशेष कथा वाटली, परंतु ती अगदी सामान्य आहे. कारण, जगण्याची इच्छा सोडून कोणीही हुकूमशाहीला सहकार्य करू शकतं. संदिग्धता आणि दुहेरी विचार यांचे संयोजन करणारा ते एक मोहक पात्र आहे. हिटलर देखील त्याच्या पुस्तकात एक विरोधाभासी माणूस म्हणून दिसतो. जो माणूस सहा लाख यहुद्यांच्या हत्येचा आदेश देतो पण मांस खात नाही. प्राणी खाणे त्याला क्रूर वाटते.

हिटलर खरोखर शाकाहारी होता आणि त्यामागील काही क्रूर कारण होते का? यावर लेखिका रोजेला पॉस्टोरिनो म्हणते, होय, आम्हाला हिटलरच्या सेक्रेटरीकडून ही माहिती मिळाली. त्यानेच हिटलर शाकाहारी असल्याचे सांगितले आणि एकदा आपल्या विश्वासू लोकांसोबत जेवताना हिटलरने सांगितले, की त्याने कत्तलखाना पाहून मांस खाणे सोडले.

हिटलरसारख्या माणसाला कत्तलखाने आवडत नाहीत, हे विचित्र वाटले. त्याच वर्षी त्याने वंशविरोधी कायदा बनविला जो यहुद्यांच्या नरसंहाराची सुरवात होती. परंतु, त्याच वेळी त्याने एक कायदा देखील बनवला ज्यात कुत्र्यांच्या शेपटी आणि कानांना इजा करण्यास मनाई होती, जी सहसा त्या वेळी केली जात होती. हिटलरबाबत बराच विरोधाभास दिसून येतो. आतड्यांसंबंधी समस्या असूनही, हिटलरने बरेच चॉकलेट खाल्ले, परंतु त्यानंतर आहार आणि उपवास करून आठवड्यातून त्याने अनेक किलो वजन कमी केले.

रोजेला पॉस्टोरिनो म्हणते, नाझी प्रचाराने हिटलरला देवता म्हणून साकारले आहे, ज्याच्या हातात एखाद्याचे आयुष्य आहे आणि जे दृश्‍यमान नाही. पण, ज्यांना हिटलर जवळून माहीत आहे, ते त्याला माणूस म्हणून संबोधतात आणि हे फार महत्त्वाचे आहे. हिटलरचे मानव म्हणून वर्णन केल्याबद्दल काही जण मला दोष देऊ शकतात, परंतु तो मनुष्य होता आणि मला वाटते की त्याची आठवण ठेवणे ही एक प्रकारची जबाबदारी आहे. एखादी वाईट गोष्ट समजून घेण्याशिवाय कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याचे विश्‍लेषण करण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही.

स्त्रियांना एखाद्या व्यक्तीच्या अन्नाची चव घेण्याची गरज का होती?

याबद्दल रोजेला पॉस्टोरिनो म्हणते, मला माहिती नाही, मी मार्गोट व्होएकला असे विचारले असते पण तसे होऊ शकले नाही. तथापि, बोलोगा विद्यापीठाचे जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणतात, की हे काम टेस्टर्सच्या विविध गटांतून केले जात होते. पहिल्या गटाने जेवणाचा पहिला भाग, दुसरा गट दुसरा भाग खायचा आणि उर्वरित गटातील महिला जेवणाची चव तपासत होत्या. यामुळे कोणते अन्न खराब आहे हे ओळखणे सोपे होत होते. पण, यासाठी 15 स्त्रियांची काय गरज होती हे मला माहिती नाही. यासाठी तीन किंवा जास्तीत जास्त सहा लोक पुरेसे असतील. आणि फक्त महिलांनाच पदार्थ चाखण्याचे काम का दिले जायचे? याबाबत सांगितलं जातं, की पुरुष युद्धात जात होते आणि जे लढायला गेले नाहीत ते आजारी किंवा वृद्ध होते. त्यामुळे या कामासाठी फक्त महिलाच राहात होत्या.

सर्व परीक्षक आर्य महिला होत्या?

याबद्दल रोजेला म्हणते, होय, मला आश्‍चर्य वाटते की हिटलरने या कामासाठी यहुद्यांना का निवडले नाही? मला हा प्रश्न मार्गोट व्होएकलादेखील विचारता आला नाही आणि मला स्वत:च उत्तर शोधायचे होते. हिटलरला यहुद्यांना त्याच्या घरी पाहायचे नव्हते, कारण तो त्यांना प्राण्यांपेक्षा निम्न दर्जाचा समजत असे. त्याच वेळी, देशासाठी जीवन देण्याचा मान राखला, म्हणून हे काम जर्मनीच्या लोकांना देण्यात आले.