

Institution of marriage
esakal
दोन-एक वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या एका उच्चशिक्षित जोडप्याने लग्न केल्यानंतर अवघ्या २४ तासांत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. साहजिकच आता लग्नसंस्थाच संकटात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. बदल शाश्वत आहे, हे आताच्या पिढीने मान्य केलं आहे. लग्नसंस्थाही बदलातून चालली आहे. दोन व्यक्तींना मोकळेपणाने एकत्र राहण्यासाठी लग्नसंस्था उपयोगी पडणार नसेल तर हळहळू तिच्याशीच काडीमोड घेतला जाईल, हे नक्की.
रवेळी तरुण जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी आली, की लगेच चर्चांना उधाण येतं. ‘आताच तर केलं होतं लग्न...’, ‘टिकवता येत नसेल तर करता कशाला?’, ‘लग्न म्हणजे चेष्टा वाटते का यांना’, ‘सगळा पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव आहे’ वगैरे वगैरे... खरंतर मध्यमवयीन आणि प्रौढ जोडपी हल्ली सर्रास घटस्फोट घेतात. त्यावरही चर्चा होतेच. मुळात घटस्फोट हा दोन व्यक्तींमधला प्रश्न आहे, त्यात कुणी का पडावं? पण लग्न हे अनेकदा फक्त दोन माणसांत होत नसतं ना... दोन कुटुंबं, खानदान, काही वेळा दोन गावं ही लग्नामुळे जोडलेली असतात आणि घटस्फोट घेतला, की काय काय तुटणार आहे, याची कुणालाच कल्पना नसते.