

Ranbhul nature experience
esakal
हृदयनाथ मंगेशकर
गुरुजींच्या घरून मंगेशीच्या देवळात जाणाऱ्या मास्टर दीनानाथ यांना चकव्यात सापडल्याचा भास झाला. तिथे भेटलेल्या एक वयोवृद्ध गृहस्थाने त्या लहान दीनानाथ यांना खूप काही समाजावून सांगितलं. त्या दोघांच्या गप्पा रंगल्या. सारेच ते वेगळं होते. त्यात मीरा आली, निसर्ग आला. नेमके काय बोलणे झाले दोघांमध्ये... हे सारे उलगडलंय या भागात...
...तर निसर्ग रानभूल निर्माण करून मानवाला
का भूलवू शकत नाही? का संभ्रमात पाडू शकत नाही ?
तू भूत, प्रेत, जादूटोणा मानत नाहीस.
पण आजच्या रातीने, अकल्पित प्रसंगांनी,
या रानाने तुला ‘चकवा’ या सारखी अनैसर्गिक,
माणसाच्या भीतीतून निर्माण झालेली कल्पित कथा
मान्य करायला शिकविली की नाही।
मुला! ही रानभूल भयकथा नाही. ती हवीहवीशी
वाटणारी द्दष्यकथा आहे. रानभूल
हा एक भासमय सौंदर्य प्रत्यय आहे.
पहाटेची वेळ असते.
थंडगार हवा झुळकत असते.
प्रत्येक झाडाला, पान-फुलांना,
लतावेलींना नव्या प्रकाशाची चाहूल
लागलेली असते. प्रत्येक गवताच्या पातीवर
दवाचे थेंब सांभाळून तोल सावरत बसलेले
असतात. वारियाची पहाट झुळूक त्यांची
सावध बैठक तुटू नये, म्हणून सावधपणे वाहत असते.
तोच आकाशाच्या चिलमनमधून, म्हणजे
चिकाच्या पडद्यातल्या, जाळीमधून, झरोक्यातून
पहिले किरण पृथ्वीवर प्रकटण्या प्रयत्न करू लागते.
‘‘खुब पर्दा है जो चिलमन से लगे बैठे हो
साफ छुपते भी नही, सामने आते भी नही’’
(सूर्याचे पहिले किरण, अभ्राआड असे लपले आहेत,
की जणू एक सुंदरी चिकाच्या पडद्याआड
बसली आहे, स्वच्छ दिसतही नाही,
आणि सरळ समोर येतही नाही.)
आणि फिकट हिरव्यागार तृण मखमालीवर
एक अतिशय सुंदर, विविध रंगांच्या नाजूक
नक्षीने सजलेला एक रेशीम तंतूंचा गालिचा
पसरलेला दिसतो.