

Master Deenanath Life
esakal
हृदयनाथ मंगेशकर - saptrang@esakal.com
मास्टर दीनानाथ यांना कानफडात मारल्यावर त्यांचा मावशीने त्यांना वाचवले पण त्याचवेळी त्यांच्या आईच्या रागाचाही पारा उतरला. आईच्या संतापामागे होते ते निव्वळ प्रेम आणि प्रेमच. त्यानंतर पुत्रप्रेमाने व्याकूळ झालेल्या त्या माउलीने पुत्राबद्दलची आपल्या मनातली व्यथा व्यक्त केली, ते केवळ बोलणे नव्हते, त्यात होती ती एका माउलीच्या प्रेमाची आर्तता...
तोच आईचा हताश, निराश, विषण्ण, पण
निर्धारक, आश्वासक आवाज कानावर
आला. एक शब्द, एक विचार मागे आला.
हृदय भेदून जाणारा, काहीतरी सांगण्याचा
प्रयत्न करणारा, तक्रार असलेला पण उमज
पडलेला, एक एक शब्द मोजून फेकणारा,
अंतर्मुख करणारा, जाणिवेला नेणीव करणारा,
एक आगळा वेगळा पण परंपरेत
मुरलेला, भिजलेला, रुजलेला एक विचार,
एक सुसंवाद, शब्दरूप घेऊन
सर्वांसमोर उभा ठाकला.
डोळा दृष्टीता गेला पाहिले
तव भितरू पालटू जाला
सगळ्यांना डोळे होते आणि तेही चांगले होते
दृष्टीमध्ये सतेज दृश्य होते. पण...
डोळे होते, दृष्टीही होती, पण काय पाहिले?
का पाहिले? आणि पाहून काय मिळाले?
याचे ज्ञान डोळा, दृष्टी, दृश्य यांना नव्हते.
याचे ज्ञान जोपर्यंत ‘आत्मरूप’ दृष्टीमध्ये
साकारत नाही, तोपर्यंत डोळा, दृष्टी, दृश्य
हे निरर्थकच असतात,
ज्या वेळी डोळ्यामध्ये, दृष्टीमध्ये, दृश्यामध्ये
ईश्वरी अधिष्ठान प्रस्थापित होते, त्याच वेळी
दृष्टीला आत्मरूपाचे ज्ञान होते.