
भारतात घोटाळा करावा किंवा अगदी दहशतवादी कृत्यं करावीत आणि एकदा भारताबाहेर पळून गेलं की जवळपास हयातभर तपास यंत्रणांना गुंगारा देत निवांत जगता येतं, या समजाला तडा देणाऱ्या दोन स्वागतार्ह घडामोडी मागच्या काही दिवसांत झाल्या. मुंबई बॉम्बस्फोटातील एक आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेनं भारतात प्रत्यार्पणाला मान्यता दिली. त्याला भारतात आणलं आणि तपासही सुरू झाला.
पाठोपाठ पंजाब नॅशनल बॅंकेला भारताच्या बॅंकिंग इतिहासातली सर्वांत मोठा गंडा घातलेल्या मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या दुकलीतील चोक्सीला बेल्जियमच्या यंत्रणांनी भारताच्या विनंतीवरून अटक केली. तो भारतात यायचा प्रवास अजून बराच अडथळ्याचा असेल मात्र किमान त्याला जेरबंद करता आलं. या प्रकारच्या कारवाईसाठी चिकाटीनं प्रयत्न करत राहावं लागतं. त्यात सरकार कुणाचं हा फार महत्त्वाचा मुद्दा उरत नाही. तूर्त दोन पळपुटे तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकत आहेत आणि त्या दोघांच्या कथा निराळ्या आहेत. दोन्हीतही तपास यंत्रणांचा ढिसाळपणा हेच गुन्हे घडण्याचं आणि तपास लांबत राहण्याचंही कारण आहे.