

Mark Zuckerberg AI twin
esakal
मेटा कंपनीमध्ये एक आगळा प्रयोग सुरू आहे. यात तयार होतो आहे तो कोणताही नवा गॅझेट नाही, तर स्वतः कंपनीचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांचाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल ‘जुळा भाऊ’. झुकरबर्ग यांची ही डिजिटल प्रतिकृती एका दूरच्या अमेरिकन टेक कंपनीतील प्रयोगासारखी वाटते; पण प्रत्येक भारतीय स्मार्टफोन वापरकर्त्याला माहीत आहे की सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे सुरू होते, ते फार काळ तिथेच थांबत नाही...
जगातील प्रभावशाली टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मेटामध्ये एक आगळा प्रयोग सुरू आहे. या प्रयोगात तयार होतो आहे तो कोणताही नवा गॅझेट नाही, तर स्वतः कंपनीचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांचाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल ‘जुळा भाऊ’-त्यांचा एआय अवतार. कल्पना अशी की, कंपनीत काम करणारे हजारो कर्मचारी खऱ्या झुकरबर्गना प्रत्यक्ष भेटले नसले, तरी त्यांना त्यांच्या डिजिटल रूपाशी केव्हाही संवाद साधता यावा.
ही संपूर्ण संकल्पना एखाद्या चित्रपट कथेसारखी वाटत असली, तरी ती वास्तवात आकार घेत आहे. झुकरबर्ग यांचा हा ‘डिजिटल क्लोन’ तयार करण्यासाठी त्यांच्या बोलण्याची ढब, शारीरिक हालचाली, सार्वजनिक विधाने आणि कंपनीच्या रणनीतीबद्दलची मते यांचा सखोल अभ्यास करून एआयला प्रशिक्षण दिले जात आहे. मेटाच्या दृष्टिकोनातून यामागचा तर्क साधा आहे: जगभरात कंपनीचे सुमारे ७९ हजार कर्मचारी आहेत आणि त्यांपैकी बहुतांश जणांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आयुष्यभर मिळत नाही. मागणीनुसार उपलब्ध असणारी ही एआय आवृत्ती त्या अंतरावर फुंकर घालू शकते आणि कर्मचाऱ्यांना सिलिकॉन व्हॅलीतील या सामर्थ्यशाली व्यक्तीशी अधिक ‘जोडलेले’ असल्याचा आभास देऊ शकते.