

Micro Retirement and Gen Z
esakal
दीपाली किणीकर - kinikardeepali@gmail.com
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये नोकरी, व्यवसायामधून अगदी चाळिसाव्या वर्षातच निवृत्त होण्याची मानसिकता वाढत आहे. त्याचवेळी काही लोक नोकरी, व्यवसायातून काही काळापुरता ‘ब्रेक’ घेऊन आपल्या आवडत्या गोष्टी करण्याला प्राधान्य देतात. अशा काही अल्पकालीन निवृत्तीला ‘मायक्रो रिटायरमेंट’ म्हणतात. ही आधुनिक संकल्पना तरुणाईत विशेषतः ‘जेन झी’मध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे.
आजच्या वेगवान जीवनशैलीत काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधणे हे मोठे आव्हान बनले आहे. सकाळपासून सुरू होणारी धावपळ, ऑफिसमधील वाढता ताण, सतत बदलणारे तंत्रज्ञान, स्पर्धात्मक वातावरण आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची चिंता यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, ‘आपण आयुष्यभर अशीच धावपळ करत राहायची का?’ विशेषतः माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तरुणांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळवून आयुष्याचा आनंद घेण्याची इच्छा वाढताना दिसत आहे. मात्र, कायमची नोकरी सोडण्याऐवजी, करिअरच्या प्रवासात काही काळासाठी नियोजित विश्रांती घेण्याचा एक नवा विचार लोकप्रिय होत आहे. यालाच ‘मायक्रो रिटायरमेंट’ असे म्हटले जाते. ‘मायक्रो रिटायरमेंट’ म्हणजे पूर्णपणे निवृत्त होणे नव्हे, तर करिअरमध्ये ठराविक काळासाठी घेतलेला एक विचारपूर्वक ‘ब्रेक.’