

Aurangzeb Deccan Campaign
esakal
शायिस्ताखान व अन्य मुघली मनसबदारांची शिवाजीराजांविरुद्ध डाळ शिजत नसल्याचे पाहून औरंगजेबाने आपल्या ४८व्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर म्हणजेच ३० सप्टेंबर १६६४ रोजी ‘मिर्झा राजा’ जयसिंह यास दख्खनकडे प्रस्थान करण्याचे आदेश दिले. ७० हजारांची मुघली सेना पुनश्च दख्खन गिळंकृत करण्यासाठी दौडू लागली.
जयसिंहाचा परिचय ः ‘जयसिंह’ हा अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध उमराव मानसिंहाचा पणतू होता. १७ मे १६११ रोजी जन्मलेल्या जयसिंहास १६१७मध्ये वयाच्या ७ व्या वर्षी जहांगिराने मुघली मनसब बहाल केली होती. पुढे १६२१मध्ये अंबरची (आमेर) जहागिरी व ‘राजा’ हा किताब त्याला मिळाला. शाहजहानने त्याला १६३९मध्ये ‘मिर्झा राजा’ या किताबाने गौरवले. आमेरच्या या कछवाह घराण्याचे मुघलांशी अत्यंत निकटचे नातेसंबंध होते. लष्करी मोहिमांबरोबच कपटी डावपेचांमध्येही जयसिंह हा तितकाच निष्णात होता.
जयसिंहाचे पुण्यात आगमन ः औरंगजेबाच्या आदेशावरून ३० सप्टेंबर १६६४ रोजी जयसिंह दिल्लीहून निघाला आणि ९ जानेवारी १६६५ रोजी हंडिया येथे त्याने नर्मदा नदी ओलांडली. पुढे २० जानेवारीला बुर्हाणपूर आणि १० फेब्रुवारीला औरंगाबाद गाठत, त्याने दख्खनच्या चार सुभ्यांचा सुभेदार शाहजादा मुहम्मद मुअज्जम याची भेट घेतली. (या मोहिमेत यश मिळण्यासाठी जयसिंहाने धार्मिक अनुष्ठाने केल्याचे उल्लेख बखरीत येतात.) १३ फेब्रुवारी रोजी औरंगाबादहून निघून, ३ मार्च रोजी तो पुण्यात पोहोचला. तिथे महाराजा जसवंतसिंहाने सैन्याची सूत्रे त्याच्या हाती सोपवली आणि ७ मार्च रोजी जसवंतसिंह दिल्लीकडे रवाना झाला.
डावपेचांना सुरुवात ः पुण्याकडे येत असतानाच शिवाजीराजांचे दूत जयसिंहाला दोनदा भेटले. मात्र वाटाघाटी यशस्वी न झाल्याने राजांच्या दूताला निराश होऊन परतावे लागले. जयसिंहाने आता विविध राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केली. राजांच्या अनेक शत्रूंना प्रलोभने दाखवून स्वतःकडे ओढण्यास त्याने प्रारंभ केला. आदिलशाह व कुत्बशाह यांनी राजांना गुप्तपणे सहकार्य केले. स्वराज्यातील व आदिलशाहीतील काही सरदार मात्र फुटून जयसिंहाच्या गोटात सामील झाले.