

Prahar Sanghatana Social Work
esakal
सण सगळ्यांसाठी असतात; पण आनंद मात्र सगळ्यांच्या नशिबी नसतो, हे कटू सत्य आहे. म्हणूनच आम्ही सर्वानुमते ठरवलं, दसरा आणि दिवाळी हे सण उपभोगाचे नव्हे, तर सेवेचे आणि संघर्षाचे बनवायचे. दसऱ्याला शस्त्रपूजेबरोबर सेवेचं शस्त्र उचलायचं आणि दिवाळीला दिव्यांच्या रोषणाईसोबत दिव्यांगांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या आणि कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवायचा...
दसरा आणि दिवाळी हे आपल्या संस्कृतीतले फक्त सण नाहीत, हे विजयाचं, प्रकाशाचं आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे; पण आम्ही अनेक वर्षं समाजात, शेतात, झोपडीत, रस्त्यावर आणि आंदोलनाच्या रणांगणात उभं राहून एक गोष्ट सातत्यानं पाहत आलो आहोत, या सणांच्या झगमगाटात, रोषणाईत, फटाक्यांच्या आवाजात एक मोठा वर्ग असा आहे, जो हा सगळा आनंद फक्त दुरून पाहत असतो. तो वर्ग म्हणजे, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, गरजवंत आणि रोजच्या जगण्याशी झुंज देणारा सामान्य माणूस.