

Online trolling crisis
esakal
स्कँडेनेव्हियन लोककथांनुसार पुलाखाली लपून प्रवाशांना त्रास देणाऱ्या कुरूप आणि राक्षसी प्राण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा म्हणून ‘ट्रोल’ या शब्दाचा विचार होतो. मात्र आता विश्वव्यापी संवादाचे पूल म्हणून डिजिटल आणि सोशल मीडियाचा विचार केला जात असेल, तर हे ऑनलाइन ट्रोलिंग करणारे लोक त्या संवादाच्या पुलाखालून निघून तुमच्या-आमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीन्सवर कधी येऊन पोहोचले आहेत, ते तुम्हा-आम्हाला समजलेही नाही. सध्याचे ऑनलाइन ट्रोल्स कोणाचेही चारित्र्यहनन करण्यासाठी, प्रक्षोभक विधाने करण्यासाठी आणि ऑनलाइन समुदायात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी टपून बसलेले दिसतात.
डिजिटल माध्यमांची उपलब्धता वाढू लागल्यानंतर आणि विशेषतः ज्यांना ‘सोशल’ म्हटले जाते; पण सध्या त्यांच्या दुष्परिणामांमुळे आणि गैरवापरामुळे त्यांचे ‘सोशल’ हे ‘स्टेटस’ सातत्याने वादग्रस्त ठरते, अशा समाज माध्यमांची उपलब्धता वाढू लागल्यानंतरचा काळ हा आपल्याकडे ‘डिजिटल क्रांती’ वगैरेचा काळ मानला जातो. समाजामध्ये झालेले सर्व प्रकारचे बदल कुठे ना कुठे अशा क्रांतीशी जोडण्याची एक स्पर्धा आपण अजाणतेपणीच करू लागतो. अशा स्पर्धेत एखाद्याचे एखादे मत पटले नाही, तर ते एरवी आपण सोडून दिले असते. मात्र, समाज माध्यमांनी जाणीव करून दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अवकाशामध्ये आपण ते तसे सोडून देऊ, अशी शक्यताच आता धूसर झाली आहे. त्यामुळे मतमतांतरांचे वास्तवातील अवकाश डिजिटल अवकाशात कधी बदलते, ते आपल्या लक्षातही येत नाही. दरम्यान, वास्तवात मत व्यक्त करण्याची आपली पद्धत डिजिटल अवकाशातही तशीच राहिली, तर संभाव्य अडचणी कदाचित कमी होतात. मात्र, अवकाश बदलण्याच्या घाईत आपली मत व्यक्त करण्याची रीतच बदलून गेली तर...? मत व्यक्त करण्याची आपली मूळ मानसिकता निव्वळ कृत्रिम, धंदेवाईक आणि खोटेपणानी भारलेली झाली तर...? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्याचा मानसिक छळ करेपर्यंत किंवा एखाद्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकण्याच्या आदिम प्रवृत्तीच्या जवळ जाऊ लागली तर...?