

Modern Warfare
esakal
अजेय लेले - संरक्षणविषयक तज्ज्ञ
आधुनिक युद्धाचे स्वरूप पारंपरिक रणांगणापासून तंत्रज्ञानाधारित, बहुआयामी आणि संपर्कविरहित युद्धाकडे वेगाने बदलत आहे. ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अचूक मारा करणारी शस्त्रे, सायबर व इलेक्ट्रॉनिक युद्ध, अवकाशाधारित यंत्रणा आणि माहिती युद्ध महत्त्वाची ठरत आहेत. भविष्यात स्वायत्त शस्त्रे, रोबोटिक यंत्रणा आणि अल्गोरिदमिक युद्धपद्धती निर्णायक ठरतील. त्यामुळे लष्करी सामर्थ्यासोबतच तंत्रज्ञान, माहिती आणि निर्णयाचा वेग हेही विजयाचे प्रमुख घटक असतील.
युद्ध हे मानवी संस्कृतीइतकेच जुने आहे. विविध देशांच्या आणि संस्कृतींच्या लिखित इतिहासात युद्धाला निश्चितच महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, युद्ध हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय असून, त्याचे स्वरूप पूर्वीच्या तुलनेत आज अधिक वेगाने बदलताना दिसत आहे. लष्करी रणनीतीवरील आपल्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रशियन सेनानी आणि लष्करी विचारवंत कार्ल वॉन क्लाउझविट्झ (१७८०-१८३१) यांनी ‘आपली इच्छा प्रतिस्पर्ध्यावर लादण्यासाठी केलेली हिंसक कृती म्हणजे युद्ध’ अशी युद्धाची व्याख्या केली आहे. युद्धाचे स्वरूप समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे त्याचे कालखंडानुसार विविध प्रकारांत वर्गीकरण करणे; जसे की प्रागैतिहासिक युद्धे, प्राचीन युद्धे आणि आधुनिक युद्धे. दुसरा मार्ग म्हणजे भूयुद्ध, नौदल युद्ध आणि हवाई युद्ध अशी युद्धांच्या क्षेत्रानुसार, शस्त्रास्त्रांच्या आधारे, आणि सहभागी असलेल्या समाज किंवा लोकसमूहाच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाऊ शकते. युद्धात वापरल्या जाणाऱ्या डावपेचांच्या आधारेही गनिमी कावा, वेढा, अनियमित युद्ध आदी प्रकार सांगता येतात.