
माकडांतल्याच एका प्रजातीचे आपण अवतार. माकडांच्या गोष्टी मात्र भारी असतात. माकडं माणसासारखी वागत असतात. खातात कमी, नासधूस जास्त. मोठमोठ्या हॉटेलमधल्या थाळ्या, पंगती पाहताना झाडावर धुडगूस घालून माकडांनी केवळ चव घेऊन फेकलेली फळं आठवतात.
माकड आणि माणसं जवळजवळ जवळची. म्हणजे त्यांच्यातल्या एका प्रजातीचे आपण अवतार. आपल्यात तशीच ऊर्जा, उत्साह, कुतूहल, उधळपट्टी, संताप आहेच. माकड माणसाकडून शिकतं. माणूस माकडाकडून शिकतो. माणसाने जरा विज्ञानात प्रगती केली. माणूस माकडावर प्रयोग करू लागला. माकडांचे पूर्वीपासून माणसावर प्रयोग चालूच आहेत. गावात धुमाकूळ घालून पळणे असो किंवा माणसं जे खातात ते चाखून बघणं असो... तरीही माकडांच्या काही गोष्टी माणसाला समजून घेण्यासारख्या आहेत.