

Monsoon Driving Safety
esakal
अरविंद रेणापूरकर - arvindrenapurkar@gmail.com
मॉन्सूनचा पहिला पाऊस आल्हाददायक आणि सुखावह असतो. पावसाचे पाणी अंगावर घेत दुचाकीवरून प्रवास करण्याचा अनुभव आनंददायी असतो, तर चारचाकी वाहनातून डोंगरकपाऱ्यातून वाहणारे धबधबे पाहणे नेत्रसुखद असते. मात्र, काही वेळा या आनंदावर विरजण पडू शकते. पावसामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मोटारीची तपासणी केल्यास मॉन्सूनमध्ये तुमची गाडी विनातक्रार प्रवासाचा आनंद देऊ शकते.
पावसाळ्यापूवी किंवा सुरुवातीच्या काळात दुचाकी किंवा चारचाकीची सर्व्हिसिंग केल्याaस पुढील चार-सहा महिने गाडीबाबत फारशी अडचण उदभवत नाही. विशेषत: टायर खराब झाले असतील, तर ते पावसाळ्यापूर्वी बदलणे किंवा दहा हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पूर्ण झाले असेल, तर व्हिल अलायनमेंट आणि बॅलन्सिंग करणे, इंजिन ऑइल, दुचाकी वाहनांची बॅटरी आदी प्राथमिक बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात चिखल आणि पाण्याचा सर्वाधिक परिणाम मोटारच्या अंडरबॉडीवर होतो. ओलसर वातावरणामुळे गाडीच्या धातूच्या भागांना गंज चढू शकतो. त्यामुळे वाहनाचा मजबूतपणा कमी होण्याबरोबरच भविष्यात मोठा दुरुस्ती-खर्चही येऊ शकतो. अँटी-रस्ट कोटिंग हे रबरासारखे संरक्षक लेयर असते, जे पाणी आणि धातू यांच्यात अडथळा निर्माण करते. त्यामुळे गंज कमी होतो आणि वाहनाचे आयुष्य वाढते.
पावसाळ्यात मोटारीच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. अनेकदा उंदरांमुळे वायरिंग कापले जाते किंवा निष्काळजीपणामुळे वायरिंग सैल होते. अशा स्थितीत पाणी गेल्यास शॉर्टसर्किट होऊ शकते. काही वेळा वाहनाला आग लागण्याचाही धोका असतो. त्यामुळे मॉन्सूनपूर्वी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये कारची वायरिंग, बॅटरी आणि फ्यूज तपासून घेणे गरजेचे आहे. खराब वायरिंग त्वरित दुरुस्त केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते.