

Smartphone Addiction
esakal
डोळे उघडताच अनेक जणांचा हात अलार्म बंद करण्याऐवजी थेट मोबाईलकडेच वळतो. रात्री झोपताना बाजूला ठेवलेला फोन सकाळी उठताच पुन्हा हातात येतो. रात्रीच्या वेळी कोणाचा मेसेज आला का, कोणाचा फोन आला होता का, सोशल मीडियावर काय नवीन घडले, की जगात काही मोठी घटना घडली, हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना मोबाईलकडे ओढून नेते. आजच्या काळात सकाळी उठताक्षणी मोबाईल बघणे हे कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनातील अगदी सहज आणि सवयीचा भाग बनून गेले आहे.
२०२६ मधील एका अभ्यासातून असे समोर आले आहे की सकाळी उठल्या उठल्या पहिल्या २० मिनिटांत फोन वापरल्यास दिवसभरातील आनंद आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तरीही जाग येताच आपला हात नकळत फोनकडे का जातो, यामागे मेंदूची नेमकी कोणती प्रक्रिया कार्यरत असते, साधा नोटिफिकेशनचा आवाज ऐकू आला तरी एकाग्रतेवर कसा परिणाम होतो, आणि ही सवय सोडून सकाळचा वेळ अधिक चांगला कसा घालवता येईल, हे सगळं आपण सकाळ+ विशेष लेखाच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
ही सवय किती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे, हे समजून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या संशोधनांचा आढावा घेणे आवश्यक ठरते. पुडुचेरी येथे ७७४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ५५.७ टक्के विद्यार्थ्यांनी सकाळी डोळे उघडताच मोबाईल पाहतो, असे सांगितले. या संशोधनातून हेही स्पष्ट झाले की, कोणतेही कारण नसताना वारंवार फोन पाहणे आणि उठल्या उठल्या फोन हातात घेण्याची सवय यांचा ‘नोमोफोबिया’शी म्हणजेच फोन जवळ नसल्यास जाणवणार्या अस्वस्थतेशी थेट संबंध आहे. या ७७४ विद्यार्थ्यांपैकी २३.५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये गंभीर प्रकारचा नोमोफोबिया आढळून आला.