
कीटक विश्वातील सर्वात यशस्वी सदस्य असलेल्या पतंगाविषयी जागरूकतेचा अभाव दिसून येतो. पतंग पर्यावरणाचे आरोग्य निर्देशक मानले जातात. पतंगांविषयी जनजागृती करण्यासाठी १९ ते २७ जुलैदरम्यान ‘राष्ट्रीय पतंग आठवडा’ जगभर साजरा होत असून त्यात त्यांच्या नोंदी करण्यात येणार आहेत.
पा वसाचे आगमन झाले, की नवसंजीवनी मिळाल्यासारखे सर्वत्र कीटक दिसू लागतात. जेव्हा सुंदर, रंगीबेरंगी आणि नक्षीदार पंख असलेल्या कीटकांविषयी बोलले जाते तेव्हा फुलपाखरे सहसा लक्ष वेधून घेतात. कविता, गोष्टींमधूनही फुलपाखरांविषयीचे अलंकारिक उल्लेख आणि वर्णने आढळून येतात. मात्र फुलपाखरांचेच नातेवाईक व सुमारे ३०० दशलक्ष वर्षांपासून पृथ्वीतलावर अस्तित्व टिकवून असलेले कीटक विश्वातील सर्वात यशस्वी सदस्य ‘पतंग’ (मॉथ) यांच्याविषयी मात्र सहसा लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव दिसून येतो.
फुलपाखरे मुख्यतः दिवसा सक्रिय असतात; तर बहुसंख्य पतंगांच्या प्रजाती निशाचर असल्याने सहसा आपल्या नजरेस पडत नाहीत आणि म्हणूनच कदाचित त्यांची फारशी दखल घेतली जात नसावी. वास्तविक पाहता फुलपाखरांच्या तुलनेत पतंग काकणभर जास्तच सुंदर दिसतात, असे माझे प्रामाणिक मत आहे. पतंगांचे आकार, पंखांवरील नक्षी आणि विलक्षण रंगसंगतीमुळे ते सहज बाजी मारून जातात.