

The Journey Behind MPSC Success
esakal
लेखक : हर्षवर्धन शशिकांत माने
आपण अनेकदा वेगवेगळ्या पुस्तकांत वाचतो, ज्येष्ठांकडून ऐकतो आणि संभाषणांमध्ये सहज बोलून जातो की, ‘जेव्हा तुमची ध्येये, तुमच्या आकांक्षा आणि तुमची स्वप्ने ही या अथांग निसर्गाशी सुसंगत होतात, तेव्हा तुम्हाला यश मिळविण्यापासून जगातली कोणतीही ताकद रोखू शकत नाही.’ हे वाक्य वाचायला किंवा ऐकायला जितके सुंदर वाटते, तितकाच त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात अनुभव घेणे हा एक अत्यंत विलक्षण अनुभव असतो. जेव्हा या प्रवासात अनेक आव्हाने पार करून आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचतो आणि या वाक्याची वास्तवात प्रचिती येते, त्यावेळी मनाला जो साक्षात्कार होतो, तो शब्दात मांडणे खरोखरच कठीण असते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आयोजित करण्यात आलेल्या 'संयुक्त मुख्य परीक्षा - २०२४' चा निकाल जेव्हा जाहीर झाला, तेव्हा राज्यात १४ व्या क्रमांकाने 'सहायक कक्ष अधिकारी (ASO - गट-ब, मंत्रालय)' या पदी माझी निवड झाली होती. तो क्षण माझ्यासाठी केवळ एका परीक्षेचा निकाल नव्हता, तर अनेक वर्षांच्या संघर्षाची, त्यागाची आणि संयमाची मिळालेली एक गोड पावती होती. निकाल पाहिल्यावर माझ्या डोळ्यांसमोरून माझ्या या संपूर्ण प्रवासात मला साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा एखाद्या चित्रपटासारखा सरकत होता. माझे आई-वडील, माझे आजोबा, मला घडवणारे शिक्षक आणि संकटाच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले माझे मित्र-मैत्रिणी या सर्वांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि त्या अपेक्षांवर खरे उतरल्यानंतर मिळणारा तो निखळ आनंद, त्या एका क्षणात सामावला होता.