एका पत्रकाराने हादरवलेले ब्रिटीशांसोबत टाटांचेही साम्राज्य... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mulshi dam protest journalist role in british rule }

एका पत्रकाराने हादरवलेले ब्रिटीशांसोबत टाटांचेही साम्राज्य...

मुळशीकरांनी शंभर वर्षांपूर्वी पारतंत्र्यात असताना एक मोठा लढा दिला होता. हा लढा एकट्या ब्रिटीश साम्राज्यासोबत नव्हे; तर ‘टाटा’ या बलाढ्या उद्योगपतीसोबतही होता. विशेष म्हणजे या लढ्याचे स्फूर्तीस्थान एक पत्रकार होते. देशातील धरणग्रस्तांचा हा पहिला लढा एका पत्रकाराने घडवून आणला होता आणि त्यांच्या या लढ्यामुळे इंग्रज सरकारही घाबरले होते.

मुळशी तालुक्यातील माले हे माझे गाव... प्रसिद्ध अशा मुळशी धरणाची महाकाय भिंत माझ्या दारात उभे राहिले की सहज दिसते. लहानपणापासून या भितींविषयी अनेक गोष्टी ऐकल्या. आमच्या एका शेताला ‘इटकाराचे वावर’ म्हणून ओळख आहे. त्याचे कारण की, या धरणाच्या कामावेळी विविध कारणांसाठी वापरलेल्या विटांची निर्मिती या शेतात केली होती. त्यामुळे या शेतात विटांचे तुकडेच तुकडेच होते. माझ्या आजोबा-पणजोबांनी ते हटवून त्याला पुन्हा शेती सुरू केली. पण, त्याची ओळख ‘इटकाराचे वावर’ म्हणून कायम राहिली. तर, धरणाचे आणि आमचे एवढे जवळचे नाते आहे.

या धरणाचा आणि इतिहासाचा काही तरी संबंध आहे, हे शालेय जीवनात समजले. चुलत भावंडांच्या इतिहास पुस्तकात असलेल्या ‘मुळशी सत्याग्रह’ या चार ओळीच्या प्रकरणातून आमच्या गावाचा आणि भागाचा अभिमान वाटू लागला. पुढे गावातीलच माध्यमिक शाळेत म्हणजे सेनापती बापट माध्यमिक विद्यालयात या इतिहासाशी थेट संबंध आला. १२ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबर या सेनापती बापटांच्या अनुक्रमे जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमातून सेनापती बापट यांचे कार्यकर्तृत्व समजत गेले. पण, त्यापुढे किंवा मागे काहीतरी या धरणाचा आणि मुळशी सत्याग्रहाचा इतिहास आहे, हे कधी समजलेच नाही. पण, या सोनेरी इतिहासाची पाने राजेंद्र व्होरा यांच्या ‘मुळशी सत्याग्रह’ या पुस्तकरुपातून भेटली, तेव्हा एक नाव समोर आले, ते म्हणजे विनायकराव भुस्कुटे. जे या लढ्याचे पहिले हिरो आहेत.

या लेखाच्या मथळ्यात म्हटले आहे की, ‘एका पत्रकाराने हादरवलेले ब्रिटीशांसोबत टाटांचेही साम्राज्य...’ तर ते पत्रकार होते, हेच विनायकराव भुस्कुटे. इतिहासाच्या काळाखोत अनेक पात्रे अदृश्य आहेत, त्यातील हे एक नाव. एकेकाळी सूर्यास्त न होणाऱ्या ब्रिटीशांच्या साम्राज्याला आणि देशातील सर्वात बलवान असलेल्या टाटांच्या साम्राज्याला त्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर आणि कार्यकर्त्याच्या रुपातून टक्कर दिली. त्यांनी घडवून आणलेला हा ‘मुळशी सत्याग्रह’ साम्राज्यवादी अर्थव्यवस्थेविरूद्धचा एक लढा होता.

पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या तत्कालीन हवेली तालुक्याच्या मुळशी पेट्यात शंभर वर्षांपूर्वी एक धरण बांधण्याचा आणि या धरणाच्या पाण्यापासून तयार होणाऱ्या विजेवर मुंबईतील कारखान्यांतील यंत्रे चालविण्याचा टाटा कंपनीचा विचार होता. त्यांच्या या कल्पनेला तत्कालीन ब्रिटीश साम्राज्याचा पाठिंबा होता. पण, या धरणाच्या निर्मितीमुळे एक दोन नव्हे; तर ४८ गावे बुडणार होती. हजारो संसार उघड्यावर येणार होते. पण, या मावळ्यांचा आवाज त्या पेट्याच्या बाहेर येत नव्हता. या धरणाच्या कामासाठी स्थानिक शेतकऱ्यांवर अनेक अन्याय केले जात होते. धरणामुळे येथील स्थानिक शेतकरी देशोधडीला लागणार होता.

हेही वाचा: गॅस : एलपीजी की पीएनजी?

‘आधी पुनर्वसन, मग धरण’ ही संकल्पना घेऊन स्वातंत्र्यानंतर अनेक आंदोलने झाली. पण, जगभरातील धरणग्रस्तांच्या आंदोलनाचे मूळ मुळशी धरणाच्या लढ्यात आहे. एवढेच नव्हे तर त्यावेळेच्या ब्रिटीश सरकारविरोधातील वारेही या लढ्यात होते. याबाबत त्याचवेळी सेनापती बापट यांनी लिहिलेली कविता भविष्याची जणू वेध घेणारी होती.

यह मुलशी रण मूल है

महाराष्ट्र निद्रा भंग का

मुलशी रण मूल मानो

भावी भारत के जंग का

अशा या मुळशी धरणग्रस्तांच्या लढ्यात स्वातंत्र्याच्या लढ्याचीही बिजे रोवलेली होती, हे सेनापती बापट त्यावेळी सांगत होते.

सेनापती बापटांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लढ्याची सुरुवात मात्र विनायकराव भुस्कुटे यांनी केली. फक्त सुरुवात केली, असे म्हणूनही चालणार नाही. कारण, असा काही लढा उभारता येऊ शकतो, अशी मानसिकता त्यांनी मुळशीकर मावळ्यांची तयार केली. त्यामुळे मुळशीकरांच्या या लढ्याचे प्रवर्तक म्हणून त्यांची खरी ओळख आहे. पण, दुर्देव हे आहे की, आजही मुळशीतीलच काही मोजक्याच लोकांना हे नाव माहीत आहे.

भुस्कुटे हे पुण्यातील ‘लोकसंग्रह’ या नियतकालीकात ‘वार्ताहर’ म्हणून काम करत होते. त्यावेळी मुळशी पेट्यात टाटा कंपनी धरण बांधत आहे आणि तेही तेथील स्थानिक मावळ्यांवर अत्याचार करून त्यांचा काम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याबाबतचे वृत्त त्यांच्या कानावर आणि केसरी वर्तमानपत्रातून वाचनात आले. त्यामुळे त्यांनी मुळशी पेट्याला भेट देण्याचे ठरवले. त्यांची ती कल्पना त्यांनी त्यांच्या संपादकांना सांगितली आणि त्यांच्या परवानगीनंतर ते मुळशी पेट्यात माहिती घेण्याकरता दाखल झाले. त्यावेळी साधा रस्ताही नसणाऱ्या मुळशी पेट्यात मजल दरमजल करत ते पोचले आणि तिथली माहिती घेतली. ‘भाताचे कोठार’ म्हणून ओळख असलेला हा परिसर धरणाच्या कवेत जाणार आणि इथलं बळीराजा उघड्यावर येणार, या विचारानेच भुस्कुटे अस्वस्थ झाले. त्यांनी याविषयी आवाज उठविण्याचा विचार केला. त्यातून त्यांनी आपल्या नियतकालीकातून तसा प्रयत्न केला आणि ते तेवढ्यावरच थांबले नाही, तर संपूर्ण मुळशी पेटा पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरू लागले. लोकांना भेटू लागले. त्यांच्यात जागृती करू लागले.

पत्रकारात एका कार्यकर्ता दडलेला असतो, असे म्हणतात. तशा प्रकारे भुस्कुटे यांच्यातील कार्यकर्ता जागा झाला होता. तो या धरणाच्या विरोधात स्थानिकांना जागा करत होतो. सुमारे वर्षभर त्यांनी मुळशी पेट्यातील गावनंगाव पायाखाली घातले आणि स्थानिक नागरिकांमध्ये जागृती केली. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले. स्थानिकांचा आवाज एक झाला आणि त्यांनी टाटा कंपनीच्या या साम्राज्याविरोधात उठाव करायचे धाडस केले. स्थानिक नागरिकांप्रमाणेच देशभरातही या लढ्याविषयी माहिती देण्यात आली. महात्मा गांधी, शंकरराव देव, सरोजिनी नायडू अशा दिग्गजांनी या लढ्याला पाठिंबा दिला. संपूर्ण देशभरात या लढ्यासाठी आवाज उठविण्याचा निर्णय झाला. या प्रयत्नातून पुढे सेनापती बापट हे या लढ्यात सहभागी झाले आणि लढा लढले. पुढे या संपूर्ण लढ्याचे नेतृत्वच त्यांनी केले. या लढ्यातच त्यांना ‘सेनापती’ ही पदवी बहाल करण्यात आली.

हेही वाचा: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उद्योजक गिरीश मालपाणी यांचा प्रेरणादायी प्रवास; पाहा व्हिडिओ

या लढ्याच्या सुरुवातीला सत्याग्रह विचाराने हा लढा लढण्याचा विचार झाला. त्यातून १६ एप्रिल १९२१ हा रामनवमीचा दिवस सत्याग्रहाचा दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यासाठी सत्याग्रह मंडळाची स्थापना झाली. त्याच्या अध्यक्षपदी तत्कालीन दिग्गज पत्रकार व नेते ज. स. करंदीकर यांची, तर सचिव म्हणून विनायकराव भुस्कुटे यांची निवड झाली. अशा प्रकारे एका पत्रकाराने धरणग्रस्तांचा आवाज लेखणीतून जनतेसमोर मांडलाच व त्यांना लढ्यासाठी उदयुक्त करून त्यांचे नेतृत्वही केले. त्यांच्या या कार्यामुळे तत्कालीन ब्रिटीश सरकारही खडबडून जागे झाले. टाटांनी लढा मोडीत काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. कारण, या धरणाच्या कामापूर्वी त्यांनी शेजारील मावळ परिसरातील लोणावळा परिसरात चार छोटी धरणे बांधली होती. पण, मुळशीत भुस्कुटे यांच्यामुळे त्यांच्या स्वप्नांना धक्का बसायला लागला होता. भुस्कुटे यांनी उभारलेला हा लढा मोडीत काढण्यासाठी कंपनीने अनेक उपाय वापरले. सत्याग्रहींवर अनेक अत्याचार केले. एक पत्रकाराने तत्कालीन दोन साम्राज्यांना हादरे दिले होते.

भुस्कुटे हे या लढ्याशी आणि मावळ्यांशी एवढे एकरूप झाले होते की त्यांनी अन्यायाशी संबधित ‘मावळ्याची करुण’ कहानी ही कादंबरीही लिहिली. पण, त्यांच्या या लढ्याला इतिहासात स्थान अपेक्षेपेक्षा कितीतरी नगण्य मिळाले. त्यातून मुळशीकरांचा हा खरा हिरो पडद्यआडच राहिला. पण, आता हळूहळू भुस्कुटे यांची ओळख मुळशीकरांना होत आहे. शंभर वर्षांनंतर मुळशीकरांचा हिरो समोर येत आहे. त्यांनी शंभर वर्षांपूर्वी दिलेला हा लढा जगभरातील धरणग्रस्तांच्या लढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top